वारणा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने नागरिकांतून समाधान….

वाळवा तालुक्यात मागील आठवड्यातील शनिवारी रात्री मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला होता या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी भुईमूग सोयाबीन तसेच आडसाली उसाची लागवड केली होती. तसेच भात पिकांची पेरणी करून घेतली होती. मात्र शनिवारनंतर गुरूवारपर्यंत पावसाने दडी मारल्याने शेतकरी चिंतेत होते. केवळ वातावरण निर्मिती होत होती. मात्र गुरुवारी दुपारी मध्यम स्वरूपाच्या पावसाने हजेरी लावली. हा पाऊस अर्धा तास पडत होता यामुळे भात, भुईमूग, सोयाबीन, ऊस या पिकांना दिलासा मिळाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकांमध्ये समाधान निर्माण झाले आहे.

तांदूळवाडीसह परिसर हा ऊस पिकाचा पट्टा म्हणून ओळखला जातो. मात्र यंदा पावसाने सुरुवतीसच लपंडाव सुरू केल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली होती. शनिवारी झालेला पाऊस त्यानंतर गुरुवारी झाल्याने आशा पल्लवीत झाल्या आहेत. तांदूळवाडी (ता. वाळवा) परिसरातील कुंडलवाडी, मालेवाडी, बहादूरवाडी या गावाला वारणा नदीतून शेतीला व पिण्यासाठी पाणीपुरवठा केला जातो ही वारणा नदी चांदोली धरणापासून प्रवाहित होते.

सध्या चांदोली धरण क्षेत्रातील परिसरात सारखा पाऊस पडत असल्याने ह्या पावसाचे पाणी या नदीला मिळते ते पाणी सध्या वारणा नदीला आले आहे, त्यामुळे नदीतील पाणी पातळी वाढली जात आहे. त्यामुळे नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे. तांदुळवाडी परिसरातील कुंडलवाडी, मालेवाडी,बहादूरवाडी, कनेगाव, भरतवाडी गुरुवारी दुपारी पडलेल्या हलक्या पावसामुळे ग्रामस्थांना दिलासा मिळाला.