सध्या मान्सून पावसाला सुरुवात झालेली आहे. पावसाळ्यात अनेक साथींच्या आजारांना सामोरे जावे लागते. पाणी साठल्याने अनेक संसर्गजन्य आजार तोंड वर काढतात. अशातच हातकणंगले तालुक्यातील आळते येथे डेंग्यूच्या आजाराने अक्षरश: थैमान घातले आहे. आतापर्यंत १५० जणांना लागण झाली असून खासगी व शासकीय रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. दिवसेंदिवस रुग्ण संख्या वाढू लागल्यामुळे नागरीक मितीच्या छायेत आहेत. त्यामुळे आरोग्य यंत्रणेविषयी तीव्र संताप व्यक्त होऊ लागल्यानंतर गुरुवारी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून पथक पाठवून घरोघरी तपासणी सुरु केली आहे.
गावात गेल्या १५ दिवसांपासून वारणा पाणी योजना बंद आहे. त्यामुळे पाण्याचा वापर कमी झाला आणि गटारी तुंबल्या. यामुळे रुग्णसंख्या वाढत असल्याची चर्चा गावात आहे. आरोग्य पथकाकडून ६ टिम तयार करण्यात आल्या असून घरोघरी तपासणी सुरु केल्या आहेत. बुधवारी एका दिवसात ५०० घरांची तपासणी करण्यात आली असून उर्वरीत २५०० घरांचे चार दिवसात सर्व्हेक्षण पुर्ण होईल आणि नेमकी स्थिती समोर येईल अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.पी.एस.दातार यांनी दिली.