वाळवा इस्लामपूर रस्त्याचे पावसातच डांबरीकरण केले जात आहे.झालेले काम निकृष्ट असल्यामुळे दुसऱ्याच दिवशी अनेक ठिकाणी डांबरीकरण निघत आहे. त्यामुळे वाहनधारक आणि नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. वास्तविक पावसाळ्यात डांबरीकरण करू नये, असा नियम असताना तो धाब्यावर बसवून फक्त रस्ता रंगविण्याचा प्रकार सुरू आहे. झालेल्या कामाला अजिबात लेव्हल नाही. डांबराचे प्रमाण अत्यल्प असल्यामुळे रस्त्याला दुसऱ्याच दिवशी खड्डे पडले आहेत. त्यावरच पावसातच डांबर फवारण्यात आले आहे. संबंधित खात्याचे अधिकारी याठिकाणी उपस्थित नसल्यामुळे रस्त्याचे काम घाईगडबडीत उरकले जात असल्याची परिसरात चर्चा आहे. हा निकृष्ट रस्ता किती दिवस टिकणार?, असा प्रश्न नागरिकातून उपस्थित होत आहे.