इचलकरंजी शहरात गुन्हेगारीचे सत्र सध्या खूपच गाजत आहे. अलीकडे गुन्हेगारीच्या घटनामध्ये प्रचंड वाढ देखील होत आहे. त्यामुळे शहरात भीतीचे वातावरण तयार झाले आहे. इचलकरंजी येथे अज्ञातांनी धारदार शस्त्राने केलेल्या हल्ल्यात युवक गंभीर जखमी झाला. शुभम विनोद कांबळे (वय २१ रा. लालनगर) असे युवकाचे नाव आहे.
याबाबत रात्री उशिरापर्यंत गावभाग पोलीसात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. याबाबत माहिती अशी, लालनगर-बेलबाग रोडवरील एका सार्वजनिक कट्ट्यावर सांयकाळच्या सुमारास शुभम कांबळे हा आपल्या मित्रासोबत चर्चा करत बसला होता. त्यावेळी त्याठिकाणी आलेल्या अज्ञात युवकांनी शुभम कांबळे याच्यावर पाठीमागून कमरेवर धारदार शस्त्राने वार केले. त्यामध्ये शुभम हा गंभीर जखमी झाला.
जखमी शुभम याला त्याच्या मित्रांनी तातडीने उपचारासाठी इंदिरा गांधी सामान्य दाखल केले. घटनेची माहिती समजताच गावभाग पोलिसांनी घटनास्थळी व रुग्णालयास भेट देऊन माहिती घेतली. घटनास्थळी गुप्तीचा कव्हर आणि एक चाकू आढळून आला आहे. दरम्यान, या परिसरात राजरोसपणे गांजा सेवन केला जात असल्याची चर्चा नागरिकात असून त्यातूनच हा हल्ला झाला असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.