पोलिस असल्याची बतावणी करीत आटपाडीत वृद्धाला गंडा

आटपाडी – भिवघाट रस्त्यावरील एचपी पेट्रोल पंपाजवळ दोन अनोळखी व्यक्तींनी, पोलिस असल्याची बतावणी करीत एका वृद्ध शेतकऱ्याला गंडा घातला. सुमारे साडेचार तोळे सोन्याच्या दागिन्यांची फसवणूक झाली आहे. याप्रकरणी आटपाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नारायण तातोबा चव्हाण -पाटील (रा. यमाजी पाटलाची वाडी, ता. आटपाडी ) यांनी फिर्याद दिली. फिर्यादीमध्ये म्हटले आहे कि, ३१ मे रोजी सायंकाळी भिवघाट रोडवरील पेट्रोल पंपाजवळून ते पायी जात असताना दोन अनोळखी इसमांनी त्यांना अडवले. ‘ आम्ही पोलिस आहोत , पुढे लुटालूट चालू आहे. तुमचे दागिने खिशात ठेवा’, असे खोटे सांगून त्यांनी फिर्यादीच्या गळ्यातील तीन तोळ्यांची सोन्याची चेन व दीड तोळ्याची अंगठी काढायला लावली. ते हे दागिने रुमालात गुंडाळत असताना एकाने, मी दागिने व्यवस्थित बांधतो . असे म्हणून रुमाल घेतला. नंतर त्यात दगड बांधून त्यांनी रुमाल परत दिला. त्यानंतर ते दोघे इसम पसार झाले.
पोलिस निरीक्षक राजीव केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरु आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून तपास केला जात आहे.