19 जानेवारीपासून डॉक्टर अनिकेत भैया देशमुख युवा मंचच्या वतीने स्व भाई गणपतरावजी देशमुख साहेब यांच्या स्मरणार्थ सांगोला तालुक्यातील कष्टकरी शेतकरी व जनतेसाठी गणेशरत्न कृषी महोत्सव 2024 चे आयोजन करण्यात येणार आहे. डॉ. गणपतराव देशमुख महाविद्यालय मैदान वासुद रोड सांगोला येथे हे आयोजन करण्यात येणार आहे. 19 जानेवारी ते 22 जानेवारी या कालावधीत हे कृषी महोत्सव होणार आहे.
या कार्यक्रमाचे उद्घाटन 19 जानेवारी रोजी सकाळी अकरा वाजता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा खासदार शरदचंद्र पवार व शेकाप चे चिटणीस भाई जयंत पाटील यांच्या उपस्थितीत होणार आहे .
यावेळी राजकीय पक्षाचे नेतेमंडळी, पदाधिकारी देखील उपस्थित राहणार आहेत. आज शेतकरी हा संकटात आहे निसर्गाचे वेळापत्रक गेल्या दशकापासून बदलते असल्यामुळे कधी दुष्काळ तर कधी अतिवृष्टी या वेगवेगळ्या उद्भवणाऱ्या संकटांचा शेतकरी जीवनावर त्याचा परिणाम झाला आहे.
स्व. आमदार गणपतरावजी देशमुख साहेबांनी प्रयत्न करून 1984 साली या भागांमध्ये शंभर टक्के अनुदानावर फळबाग लागवड योजना राबविली. त्याचा परिणाम हा सांगोला तालुक्यामध्ये डाळिंबाच्या माध्यमातून क्रांती घडली.
या कृषी महोत्सव प्रदर्शनाचे वैशिष्ट्य म्हणजे या प्रदर्शनामध्ये दोन ते तीन लाख शेतकऱ्यांची प्रदर्शनला भेट, आधुनिक शेती करीत असलेल्या भागातील भव्य प्रदर्शन, मल्टीमीडिया प्रसिद्धी कृषी संबंधित अनेक महत्त्वाच्या संस्थांचा यामध्ये सहभाग असणार आहे.
वेगाने विकसित होणाऱ्या अत्यंत महत्त्वाच्या अशा ग्रामीण बाजारपेठेत प्रवेश, नवीन उद्योगधंदांच्या प्रचंड उलाढाली, शेतकरी ग्राहकांना थेट भेटण्याची सुवर्णसंधी, आधुनिक तंत्रज्ञानाची ओळख शेतकऱ्यांना करून देण्याची शेतकऱ्यांच्या अडचणी समजावून घेऊन त्यानुसार उत्पादनात बदल करण्याची संधी, महाराष्ट्रभर प्रदर्शनाच्या प्रसिद्धीचे प्रभावी नियोजन व पिकांच्या वाढीसाठी चर्चासत्र व परिसंवादाचे आयोजन ही वैशिष्ट्ये आहेत.
त्यामुळे या कृषी प्रदर्शनास राज्यातील तसेच सोलापूर जिल्ह्यातील, सांगोला तालुक्यातील शेतकरी बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून याचा लाभ घ्यावा असे आवाहन संयोजक डॉ. अनिकेत भैया देशमुख युवा मंचच्या वतीने करण्यात आले आहे.