लोकराजा छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!

सुजलाम सुफलाम अशा कोल्हापूर जिल्ह्यात आज दिसणाऱ्या औद्योगिक प्रगतीचे मूळ लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या कारकिर्दीमध्ये आढळते. राजर्षी शाहूंनी उद्योग सुरू करण्यासंबंधी विचार मांडले, उद्योग उभे करण्यासाठी उद्योजकांना ताकद दिली.हे कार्य निश्‍चितच क्रांतिकारी स्वरुपाचे होते.

राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी २ एप्रिल १८९४ रोजी राज्यसूत्रे स्वीकारली. त्यानंतर शेती क्षेत्राला प्राधान्य देतानाच नवीन उद्योगधंदे, आधुनिक तंत्र, विद्येच्या आधारे संस्थानच्या विविध भागात उद्योग सुरू करून त्या भागांचा भौतिक व आर्थिक विकास साधावा, त्याचबरोबर जनतेला रोजगाराच्या पुरेशा संधी उपलब्ध करून द्याव्यात, या दृष्टीने पावले टाकली.

त्यांच्या आदेशानुसार सन १८९५ व १८९६ या दोन वर्षांत संपूर्ण राज्याचे औद्योगिक सर्वेक्षणाचे कार्य पूर्ण करण्यात आले.परदेशातील अनुभव व औद्योगिक सर्वेक्षण याच्या जोरावर कोल्हापूर संस्थानातील औद्योगिक प्रगतीचे नियोजन केले. या सर्वेक्षणाच्या माहितीच्या आधारे उद्योगधंद्यातील नवीन प्रयोगांना प्रोत्साहन दिले.

उद्योगधंद्यासाठी लागणारे तंत्रज्ञ व कुशल कारागीर मिळविण्यासाठी प्रयत्न केले आणि उद्योगधंद्यातील विविध प्रकारचे शिक्षण लोकांना देण्याची तरतूद केली.सुरुवातीपासूनच औद्योगिकदृष्टया उपयुक्त वस्तूंची लागवड करण्याचे राजर्षी शाहूंनी प्रयत्न केले. संस्थानच्या पश्चिम भागातील डोंगरउतरणीवर चहा, कॉफीची लागवड करण्याचा प्रयोग, गंजन गवत व सिट्रान गवत यांची लागवड करून त्यापासून तेल काढण्याचा प्रयोग, चंदन व हिरडा यांच्या जंगलातील उत्पादनवाढीचा प्रयत्न अशा अनेक गोष्टी केल्या यातून कृषिउद्योग सुरू करण्यासाठी त्यांनी प्रोत्साहन दिल्याचे दिसते.

देशी उद्योगांचे आधुनिकीकरण व विकास हा व्यवसायाला आवश्यक असणारे तंत्र व कौशल्य विकसित झाल्याशिवाय होणार नाही, हे ओळखून त्यांनी ‘जयसिंगराव घाटगे टेक्निकल इन्स्टिटयूट’ आणि ‘राजाराम इंडस्ट्रियल स्कूल’ या दोन तांत्रिक शिक्षण देणाऱ्या संस्थांची स्थापना केली.

कोल्हापुरात कापड गिरणी सुरू करण्यावर शाहू महाराजांनी विशेष भर दिला. त्यासाठी १९०५ मध्ये स्थापलेल्या कंपनीला सरकारी मान्यता दिली आणि विविध सोयी व सवलती दिल्या. ‘दि शाहू छत्रपती स्पिनिंग अॅड विव्हिंग मिल्स’ या अधिकृत नावाच्या पण ‘शाहू कापड गिरणी’ या नावाने ओळखल्या जाणा-या कोल्हापूर संस्थानातील पहिल्या आधुनिक कापड गिरणीचे उदघाटन त्यांच्या हस्ते दसऱ्याला झाले.