कोरोनाची डोकेदुखी संपली असली तरी, आता नव्या आजारानं प्रशासनाची चिंता वाढवली आहे. झिका व्हायरसनं (Zika Virus) डोकं वर काढलं आहे. पुण्यात झिका व्हायरसचे दोन रुग्ण आढळून आला आहे. ऐन वारीच्या तोंडावर शहरात झिका व्हायरसचा रुग्ण आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. 46 वर्षीय डॉक्टर आणि त्याच्या 13 वर्षीय मुलीमध्ये झीकाची लक्षणं आढळून आली आहे.
पुण्यात प्रथमच झीकाचे रुग्ण आढळले आहेत. कोथरूडच्या एरंडवणे भागातील एका 46 वर्षीय डॉक्टर आणि त्याच्या 13 वर्षीय मुलीमधे झीकाची लक्षणे आढळली आहेत. ताप आणि अंगदुखी अशी ही लक्षणे आहेत. त्यामुळे काही प्रमाणात भीतीचे वातावरण निर्माण झालं आहे. डासांच्या उत्पत्तीमुळे व्हायरस पसरतो. गरोदर महिलांना या व्हायरसचा जास्त धोका आहे. त्यामुळे गरोदर महिलांनी काळजी घेण्याची गरज असल्याचं सांगितले आहे.झिका विषाणू जीवघेणा नसला तरी महिलांवर त्याचा मोठा फटका बसू शकतो. सध्या स्थितीला हवामान बदलामुळे डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया त्याचबरोबर इतर साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे.
झिका विषाणू आजार हा एडिस इजिप्ती डासांमुळे होणारा सौम्य स्वरुपाचा आजार असून या आजारात 80 टक्के रुग्णांमध्ये कोणतीही लक्षणे आढळून येत नाहीत. इतर रुग्णांमध्ये ताप, सांधेदुखी, अंगदुखी, डोकेदुखी, डोळे लाल होणे, उलटी होणे, अस्वस्थता जाणवणे ताप, अंगावर पुरळ उठणे अशी लक्षणे आढळतात. झिका आणि इतर कीटकजन्य आजारासाठी सर्वेक्षण सक्षम करत असतानाच कोरोना सर्वेक्षण आणि लसीकरण याकडे दुर्लक्ष होणार नाही, याबाबत दक्षता घेण्याबाबत सर्व संबंधितांना आरोग्य विभागाने निर्देश दिले आहेत.
काळजी कशी घ्याल?
- घरात डास होऊ देऊ नका, घरातील स्वच्छतेची काळजी घ्या. मच्छरदाणीचा वापर करा.
- घरामध्ये साठवलेले पाणी जास्त काळ ठेवू नये व उघडे ठेवू नये
- हा आजार संसर्गजन्य नाही.
- झिका विषाणू असलेल्या व्यक्तीला डास चावून दुसऱ्या व्यक्तीला चावला तर त्याला झिकाची लागण होते.
- या विषाणूचा धोका महिलांसाठी जास्त आहे.
- घराच्या खिडक्या आणि दरवाज्यांना जाळी लावा.
- तुम्हाला डायबिटीज, हायपरटेंशन, इम्युनिटी डिसऑर्डरसारख्या समस्या असतील तर प्रवास करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घ्या.
- प्रवास करुन आल्यावर दोन दिवस ताप राहिल्यास वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या.