प्रोसेस कारखान्यातील पाणी गल्लीत आल्यामुळे नागरिकांनी याचा जाब कारखाना मालकाला विचारला. यातून कारखान्यात घुसून तोडफोड करत २० ते २५ लाखांचे नुकसान केल्याची फिर्याद अंकुश वसंत भडंगे (वय ४२) यांनी शहापूर पोलिस ठाण्यात दिली.
त्यानुसार पोलिसांनी ११ जणांवर गुन्हा दाखल केला.बाळू खिलारे, कृष्णा खिलारी, सुनील सुतके, परसू मगर, सचिन शिंदे, विनायक खिलाली, युवराज डोंगळे, श्रीकांत गावडे यांच्यासह आणखी तिघांवर गुन्हा दाखल झाला. ही घटना शुक्रवारी २१ तारखेला रात्री दहा वाजता सुमारास घडली.
याबाबतची नोंद शहापूर पोलिस ठाण्यात मंगळवारी २५ तारखेला रात्री आठ वाजण्याच्या सुमारास झाली आहे.पोलिसातून मिळालेली माहिती अशी, शहापूर येथे मेकर्स ॲन्ड फिनिशर्स प्रोसेसिंग मिल कारखाना आहे. या मिलमधील घाण पाणी गल्लीत येत असल्याच्या कारणावरून प्रोसेस परिसरातील नागरिक एकत्र जमले. याचा जाब विचारण्यासाठी कारखान्यात घुसले.
लोखंडी रॉड व दगडाने कारखान्यातील ऑफिसच्या काचा, स्टोअर रूम , डाईंग ऑफिस काचा प्रोसेसमधील मशीनवरील प्रोग्रॅम पॅनल बोर्ड, कॉटन रोल, स्टीलरोल तसेच प्रोसेसमधील लाईटसह विविध साहित्याची नासधूस करत तोडफोड केली. यामध्ये सुमारे २० ते २५ लाखांचे नुकसान झाले. याप्रकरणी अंकुश भडंगे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार अकरा जणांवर गुन्हा दाखल केला.