कोल्हापूरचे नूतन खासदार श्रीमंत शाहू छत्रपती महाराज व हातकणंगलेचे खासदार धैर्यशील माने यांनी संसदेत मराठीतून शपथ घेतली. शाहू महाराज पहिल्यांदाच, तर माने दुसऱ्यांदा खासदार म्हणून संसदेत पोहोचले आहेत.कालपासून (ता. २४) संसदेचे अधिवेशन सुरू झाले आहे. या अधिवेशनातील पहिले दोन दिवस नव्या सदस्यांचा शपथविधी सुरू आहे. त्यात आज खासदार श्रीमंत शाहू छत्रपती महाराज व धैर्यशील माने यांचा शपथविधी होता.
या दोघांनीही मराठीतून शपथ घेतली.शपथविधी सोहळ्यावेळी प्रेक्षक गॅलरीत खासदार शाहू महाराज यांच्या पत्नी सौ. याज्ञसेनी छत्रपती, सुपुत्र माजी आमदार मालोजीराजे छत्रपती, स्नुषा संयोगिताराजे छत्रपती, मधुरिमाराजे छत्रपती, नातू शहाजीराजे, यशराजराजे व यशस्वीनी राजे, बंधू संग्रामसिंह भोसले, तर खासदार माने यांच्या मातोश्री माजी खासदार निवेदिता माने, पत्नी वेदांतिका, बंधू सत्त्वशील माने उपस्थित होते.
