क्षमतेपेक्षा जास्तची ऊस वाहतूक नागरिकांच्या मुळावर, सूचना देण्याची मागणी

खानापूर तालुक्यात उदगिरी, भारती शुगर्स, विराज, कडेगाव तालुक्यात सोनहिरा, केन ॲग्रो, पलूस तालुक्यातील क्रांती, सातारा जिल्ह्यातील गोपूज, कृष्णा, रेठरे बुद्रुक या साखर कारखान्यांना खानापूर, कडेगाव तालुक्यांतून ऊस नेला जातो. ट्रॅक्टर-ट्रॉलीतून उसाची वाहतूक केली जात आहे. मात्र या ट्रॉलीतून क्षमतेपेक्षा अधिक ऊस भरला जातो. परिणामी रस्त्यावरून हे ट्रॅक्टर धावत असताना कधी नागमोडी, तर कधी सरळ धावतात. काही कारखान्यांना ऊस नेत असताना शहरातून ट्रॅक्टर न्यावे लागत असतात.शहरातील गतिरोधकावर काही वेळेला उसाने भरलेल्या ट्रॉल्या आदळल्या जातात. त्यामुळे काही वेळेला ट्रॅक्टर व ट्रॉलीला जोडलेला हूक तुटण्याची शक्यता असते.

तसेच दुचाकीचालक व नागरिकांना ट्रॉलीच्या कडेने जीव मुठीत घेऊन जावे लागत आहे. आठवड्यापूर्वी नागेवाडी (ता. खानापूर) येथे सांगली- भिगवण राज्य मार्गावर दोन ट्रॅक्टर चालकांनी उसाने भरलेले ट्रॅक्टर पळविण्याची शर्यत लावली. अपघाताला कारणीभूत ठरत असलेल्या शर्यत लावणाऱ्या संबंधित ट्रॅक्टरचालकांना नागरिकांनी ताब्यात घेऊन चांगलाच चोप दिला होता. याचा अन्य ट्रॅक्टर चालकांनी बोध घेऊन असे कृत्य न करण्याची आवश्‍यकता आहे.सध्या साखर कारखान्यांचा हंगाम सुरू झाला आहे. ट्रॅक्टर-ट्रॉलीमधून कारखान्याकडे ऊस नेला जात आहे.

मात्र, ट्रॉलीत क्षमतेपेक्षा अधिक ऊस भरला जात आहे. रस्त्यावरून भरलेली ट्रॉली जात असताना कधी अंगावर कोसळेल, याचा नेम नसल्याने ही क्षमतेपेक्षा अधिक होणारी ऊस वाहतूक वाहनधारक व नागरिकांसाठी जीवघेणी ठरत असल्याचे चित्र आहे.ट्रॅक्टरला रिफ्लेक्टर (परावर्तक) नसल्याने अपघात होत आहेत. कारखाना प्रशासनाने ट्रॅक्टर चालक व मुकादमांना ट्रॅक्टरला रिफ्लेक्टर आणि ट्रॉलीच्या प्रमाणात ऊस भरण्याच्या सूचना द्याव्यात, अशी मागणी होत आहे.