मराठा सांस्कृतिक भवन बांधण्यासाठी पाच कोटी निधी मंजूर!

पंढरपूर येथे मराठा सांस्कृतिक भवन बांधण्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून पाच कोटींच्या निधीस जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी प्रशासकीय मान्यता दिली आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आलेली आहे.कार्तिकी वारी २०२३ दरम्यान श्री विठ्ठलाची शासकीय महापूजा उपमुख्यमंत्री अजित पवार यांना करण्यास सकल मराठा समाजाने विरोध केला होता.

त्यासाठी पंढरपूर येथे मराठा समाजाच्या वतीने आंदोलन करण्यात आले होते. त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सकल मराठा समाजाच्या आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली व पंढरपूर येथे मराठा भवन बांधण्याची मागणी त्यांनी मान्य केली होती.

त्या मागणीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून पंढरपूर येथे राजर्षी छत्रपती शाहू महाराज सांस्कृतिक भवन बांधण्यासाठी निधी मंजूर केला आहे.या सांस्कृतिक भवन बांधकामाची ५ कोटी ५ लाख २१ हजार ७०४ रुपयांच्या पंढरपूर नगरपरिषदेच्या वतीने कामाची निविदाही प्रसिद्ध झाली आहे.

मात्र, पंढरपूर शहरात मराठा समाजासाठी सांस्कृतिक भवन बांधण्यासाठी जी जागा उपलब्ध झालेली आहे त्या जागेवर पालिकेचे पार्किंगचे आरक्षण असल्याने ते आरक्षण काढण्याबाबत जिल्हा प्रशासनाने नगरविकास विभागाला कळविले आहे.

तसेच हे आरक्षण काढण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने पाठपुरावा सुरू असून, पुढील आठ ते दहा दिवसांत हे आरक्षण काढले जाणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आलेली आहे.