इस्लामपूर मतदारसंघ शिवसेनेला की भाजपला? महायुतीची कसोटी……


लोकसभा निवडणुकीनंतर आता सध्या सगळीकडेच विधानसभा निवडणुकीचे वेध लागलेले आहे. आपापल्या परीने अनेक नेते मंडळींची हालचाल सुरू असलेली पाहायला मिळत आहे. परंतु विधानसभेची उमेदवारी नेमकी कोणाला मिळणार यामध्ये अजून चढ-उतार होत असल्याचे चित्र दिसत आहे. विधानसभेच्या निवडणुका लवकरच लागणार आहेत. लोकसभा निवडणुकीप्रमाणे विधानसभा निवडणुकाही महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यातच सरळ लढत होणार आहे.

इस्लामपुर मतदार संघात महाविकास आघाडीकडून जयंत पाटील यांची उमेदवारी फायनल असून, महायुतीकडून हा मतदार संघ भाजपला जाणार की शिवसेना शिंदे गटाला जाणार यावरून उमेदवार ठरणार आहे. आजपर्यंत इस्लामपुर मतदार संघात सत्ता असूनही भाजप, शिवसेनेने या मतदार संघात म्हणावे तसे काम केले नाही.

आता तर शिवसेनेमध्ये फुट पडल्यामुळे येथे केवळ शिंदे गटाचे थोडेफार हालचाल दिसून येत आहे. इस्लामपुरमध्ये जिल्हाप्रमुख आनंदराव पवार आणि मिरज पश्चिम भागात कवठेपिरानचे भीमराव माने काम करीत आहेत, तर भाजपचे जिल्हाध्यक्ष
निशिकांत पाटील असूनही त्याचा गट वेगळा आहे.

भाजपमध्ये विक्रम पाटील, राहुल महाडिक यांनीही उमेदवारीसाठी दावेदारी केली आहे. महायुतीमध्ये हा मतदारसंघ नेमका कोणाकडे जाणार हा मोठा प्रश्न आहे. भाजपकडे गेल्यास निशिकांत पाटील, राहुल महाडिक, विक्रम पाटील हे प्रमुख दावेदार असतील तर शिवसेनेकडे गेल्यास आनंदराव पवार यांच्या गळ्यात उमेदवारीची शक्यता आहे.