कल्याणनगर परिसरातील मोकळ्या मैदानात एका तरुणाचा दगडानं ठेचून खून करण्याची धक्कादायक घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली. विनायक कामण्णा हक्के (वय- २९, सध्या रा. कल्याण नगर भाग १, मूळ जामगाव, ता.मोहोळ, जि. सोलापूर) असे या तरुणाचे नाव आहे.
घटनेची खबर मिळताच विजापूर नाका पोलीस ठाण्याचे पथक तातडीने घटनास्थळी धाव घेतली. प्राथमिक माहितीनुसार सदरची घटना मध्यरात्री नंतर घडली असावी, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. हा प्रकार नेमका कोणत्या कारणामुळे झाला असावा याचा पोलीस शोध घेत आहे. घटनास्थळी फॉरेन्सिट लॅब, श्वानपथकास पाचारण करण्यात आले आहे. घटनास्थळावरच पंचनामा करण्याची प्रक्रिया सुरु आहे. सहा. पोलीस आयुक्त अजय परमार, गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील दोरगे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक दादासाहेब गायकवाड यांच्यासह पोलीस पथकांकडून शोध सुरु आहे.
महिन्यापूर्वी खून झालेल्या या तरुणाला जमावाकडून मध्यरात्री १२:३० च्या सुमारास मारहाण झाली होती. तो रस्त्याच्या कडेला थांबला होता. त्याला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, अशी सिव्हील पोलीस चौकीतील नोंदीवरुन निदर्शनास येत आहे. १ जुलैपासून आयपीसी ३०२ ऐवजी बीएनएस कलम १०३ अन्वये गुन्हा गुन्हा नोंद होईल असे पोलिसांकडून सांगण्यात आले.