सोलापूर हे ऐतिहासिक आणि औद्योगिक दृष्ट्या महत्त्वाचे शहर असून, वस्त्रोद्योग आणि धार्मिक पर्यटन यासारख्या क्षेत्रांमध्ये अग्रेसर आहे. परंतु या ठिकाणाहून थेट विमानसेवा नसल्याने शहराच्या विकासावर मर्यादा येत आहेत.सोलापुरात तत्काळ विमानसेवा सुरू करा, अशा मागणीचे निवेदन खासदार प्रणिती शिंदे यांनी केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री राममोहन नायडू किंजरापू यांना निवेदन दिले आहे.
शहरातील प्रलंबित असलेली विमानसेवा तत्काळ सुरू करण्यासाठी खासदार प्रणिती शिंदे यांनी शुक्रवारी केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री राममोहन नायडू यांची नवी दिल्ली येथे भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. सोलापूरच्या विकासासाठी विमानसेवा अत्यावश्यक असल्याचे नमूद करत त्यांनी मुंबई, दिल्ली, हैदराबाद, तिरुपती यासारख्या प्रमुख शहरांमध्ये थेट विमानसेवा सुरू करण्याची मागणी केली आहे. सोलापूर विमान प्राधिकरणाने काही विमान कंपन्यांशी बोलणी केली होती. यानुसार, फ्लाय ९१ या विमान कंपनीने २३ डिसेंबरपासून सोलापूर -मुंबई आणि सोलापूर-गोवा या मार्गांवर विमानसेवा सुरू करण्याची घोषणा केली होती.
परंतु, अद्याप कोणत्याही प्रकारची सेवा सुरू झालेली नाही. विमानतळ उड्डाणासाठी सज्ज असले तरी काही त्रुटी असल्याचे विमान कंपन्यांकडून सांगण्यात येत आहे. विशेषत: इंधन भरण्याची सुविधा उपलब्ध नसल्याने विमानसेवा उशीराने सुरू होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. तत्काळ या त्रुटी दूर करण्यात यावे, असेही या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
खासदार प्रणिती शिंदे यांच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत मंत्री नायडू यांनी येत्या काही दिवसांत सोलापुरातून नियमित विमानसेवा सुरू करण्यासंदर्भात कार्यवाही केली जाईल व बोरामणी आंतरराष्ट्रीय विमानतळाचा प्रश्नही लवकरच मार्गी लावू, असे आश्वासन दिल्याचे प्रणिती शिंदे यांच्याकडून सांगण्यात आले.