इचलकरंजीत डॉक्टर्स डेनिमित्त सायकल रॅलीचे आयोजन!

डॉक्टरांना देवाचे दुसरे रूप म्हटले जाते. देवानंतर माणसाला दुसरे जीवन देणारे डॉक्टरच आहेत. गरजू लोकांना बरे करण्यात आणि त्यांना निरोगी ठेवण्यात डॉक्टरांची भूमिका महत्त्वाची असते. राष्ट्रीय डॉक्टर दिन दरवर्षी १ जुलै रोजी साजरा केला जातो. भारतात हा दिवस पहिल्यांदा 1991 मध्ये साजरा करण्यास सुरुवात झाली.महान डॉक्टर आणि बंगालचे दुसरे मुख्यमंत्री डॉ. बिधान चंद्र रॉय यांच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा केला जातो. हा दिवस आपल्याला डॉक्टरांच्या महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी देतो.

डॉक्टर्स डेनिमित्त डॉक्टर हेल्थ क्लबकडून आरोग्य समृद्धी तसेच पर्यावरण जागृतीसाठी आज सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले. यामध्ये इचलकरंजी व परिसरातील सर्व डॉक्टर्स तसेच वेगवेगळे फिटनेस क्लब, सामाजिक संस्था, शालेय विद्यार्थी असे मिळून 250 पेक्षा जास्त सायकलस्वार सहभागी झाले होते. 10 व 20 किलोमीटर असे दोन टप्पे ठेवण्यात आले होते. प्रमुख पाहुणे डीवायएसपी समीरसिंह साळवे यांच्या हस्ते रॅलीचे उद्घाटन करण्यात आले.

आरोग्य व पर्यावरण जनजागृतीसाठी डॉक्टरांनी घेतलेल्या पुढाकाराचे कौतुक प्रमुख पाहुण्यांनी केले. या रॅलीमध्ये पारंपारिक कुलगुच्छ, मेडल्स, सर्टिफिकेट न देता पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी प्रत्येक सहभागी सायकलस्वारास एक रोप देण्यात आले. इचलकरंजीतील प्रदूषण कमी करण्यासाठी भविष्यामध्ये नो व्हेइकल डे ही संकल्पना राबविण्यासाठी समाजातील सर्व स्तरांमध्ये जनजागृती करण्याचा संकल्प करण्यात आला.

या रॅलीसाठी डॉक्टर्स हेल्थ क्लबचे सदस्य डॉ. अमित देशमुख, डॉ.सुभाष कुंभार, डॉ. रहीम खान, डॉ.अभिजीत कोंगनोळे, डॉ. प्रसाद रानडे यांचे सहकार्य लाभले.