रेंदाळ दर्ग्यावरील चांदीचा कळस लंपास! एकच खळबळ

दिवसेंदिवस चोरीच्या घटनांत खूपच वाढ होतानाचे चित्र आपणास पहायला मिळत आहे. दिवसा ढवळ्या चोर हात साफ करून जातात. बंद घरे फोडण्याच्या प्रमाणात तर अलीकडे खूपच केसेस आहेत. अशातच आता रेंदाळ मधून एक घटना उघडकीस आलेली आहे. रेंदाळ शहरातील प्रसिद्ध हजरत शेरअली दर्ग्याच्या घुमटावरील पाच फूट चांदीच्या कलश (कळस) अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याने पंचक्रोशीतील गावांमध्ये खळबळ उडाली आहे.

आठ किलो वजनाच्या कळसाची किंमत अंदाजे चार लाख रुपये असून घटनास्थळी ठसे तज्ञांसह श्वानपथकाला पाचारण करण्यात आले होते अप्पर पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे यांनी सक्त सूचना दिल्याने हुपरी पोलिसांनी तपासाची चक्रे गतिमान केली आहेत. या घटनेची नोंद हुपरी पोलिस ठाण्यात झाली आहे. ही घटना मध्यरात्रीच्या सुमारास घडली आहे. दर्ग्याच्या घुमटावर फक्त उरुसाच्या वेळीच झळकणारा (कलश) कळश गेल्या दोन वर्षांपासून कायमस्वरूपी बसवण्यात आला आहे. व्यवस्थापणाकडून खबरदारी म्हणून सभोवताली सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत.

यांची दिशा बदलून केबल तोडण्यात आल्या आहेत. ही घटना सकाळी दहाच्या सुमारास उघडकीस आली आहे. याची माहिती मिळताच सपोनी लिंगाप्पा चौखंडे यांच्यासह हुपरी पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेतली ठसे तज्ञांसह श्वान पथकही दाखल झाले मात्र, आजुबाजूला श्वान घुटमळले त्यात पाऊस आल्याने चोरांचा माग काढण्यात अडचण निर्माण झाली असून चोरटे माहीतीगार असून टेहाळणी करुन चोरी केल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

डीवायएसपी समीर साळवे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. तपासाबाबत त्यांनीयोग्य त्या सूचना दिल्या. याची फिर्याद रशिद नुरमहमद्द मुजावर (वय ५० रा. कारदगा रोड शाहू नगर रेंदाळ) यांनी दिली आहे. नमूद कलमानुसार हुपरी पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा नोंद झाला आहे.