हुपरी शहरांमधील भारतरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या सभोवताली असणारे तारेचे कुंपण हे पूर्णपणे तुटलेल्या अवस्थेमध्ये आहे. यामधून भटके श्वान पुतळा परिसरामध्ये वावरत आहेत. तसेच पुतळ्यातील अंतर्गत बाग कामाकडे लक्ष देऊन नवीन रोपे लावणे, फुलांची झाडे लावणे यावर नगरपालिका जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचे चित्र काही दिवसापासून दिसत आहे.
रात्रीच्या वेळी पुतळा परिसरामध्ये दिवे असून देखील अंधार असतो. पुतळ्याच्या बाहेरील फुटपाथ देखील पूर्णपणे फुटलेल्या अवस्थेत आहेत. वेळोवेळी पुतळा परिसरामधील स्वच्छता ही फक्त काही ठराविक महत्त्वाचे कार्यक्रम बघूनच केली जाते.
ही बाब निंदनीय असून नगरपालिकेचा भोंगळ कारभार या ठिकाणी दिसून येतो. पुतळा परिसर मोठा असल्याकारणाने कायमस्वरूपी एखादा स्वच्छता कर्मचाऱ्यांची येथे नेमणूक करावी व त्या ठिकाणी असणाऱ्या सुविधांचा अभाव याची पाहणी लवकरात लवकर करावी अन्यथा वंचित बहुजन आघाडी हुपरीच्या वतीने नगरपरिषदेवरती तीव्र आंदोलन करण्यात येईल असे निवेदन मुख्याधिकारी श्री. अजय नरळे यांना देण्यात आले.