एकाच कुटुंबाभोवती ग्रामपंचायतीचे राजकारण

ज्या गावात ग्रामपंचायत निवडणुकीवर २० वर्षापूर्वी होणारी हाणामारी अन् त्याच गावात नव्या राजकीय नेतृत्वाचा उदय झाल्याने या सर्व गोष्टींना फाटा देत ग्रामपंचायत निवडणुकीत सलग पाचव्या वेळी सत्ता हस्तगत करण्याची किमया केली खांडेकर कुटुंबाने.. आमदार समाधान आवताडे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा नियोजन मंडळ सदस्य प्रदीप खांडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली वीस वर्षांपूर्वी या गावाच्या ग्रामपंचायत निवडणुकीसाठी कमी मतदान असल्यामुळे मतदारांची मते खेचण्यासाठी अनेक प्रकारच्या युक्त्या वापरल्या जात होत्या.

त्यासाठी साम दाम दंड भेद या नीतीचा वापर केला जात होता. त्यातून काही वेळेला वादावादीचे प्रसंग देखील झाले. छोट्या गावात निवडणुकीवरून होणारे वाद परवडणारे नाहीत म्हणून गावच्या राजकारणाची दिशा बदलली. जिल्हा नियोजन मंडळ सदस्य प्रदीप खांडेकर यांनी गावातील सुशिक्षित तरुणांना एकत्र घेत ग्रामपंचायत ताब्यात घेतल्यानंतर या सर्व गोष्टींना फाटा दिला व गावातील राजकीय वैर व इतर गोष्टीत होणारा वाद कमी करण्याचा प्रयत्न केला. स्वतः पाच वर्षे सरपंच म्हणून काम करताना शासनाच्या अनेक योजना प्रभावीपणे राबवल्या.

आई जिजाबाई खांडेकर यांना बिनविरोध केले व मंगल खांडेकर यांना देखील त्याच कार्यालयात सरपंचपदाची संधी देत राजकीय समतोल साधला. त्यानंतर मागासवर्गीय आरक्षण सोडतीत सुरेखा खरबडे यांना संधी दिली व मागील पाच वर्षात भाऊ रविकांत खांडेकर यांना संधी दिली. या गावाचे ग्रामदैवत असलेल्या कामसिद्ध देवाची यात्रा सार्वजनिक स्वरूपात कशा पद्धतीने नियोजनबद्ध करावे, याचा आदर्श तालुक्याला खांडेकर बंधूंनी घालून दिला. सरपंच म्हणून प्रदीप खांडेकर यांचा राजकीय अनुभव लक्षात घेता, आमदार समाधान आवताडे यांनी त्यांना सभापतिपदाची संधी दिली.

या कार्यकाळात त्यांनी शासनाच्या घरकुल सौभाग्य योजनेतून वीज, मनरेगा, शौचालये यामध्ये प्रभावी काम करून तालुक्याचा नावलौकिक करण्याचा प्रयत्न केला. नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत भावजय कमल खांडेकर या सरपंच पदासाठी बिनविरोध निवडल्या. मुक्ताबाई बुरंगे, पूजा कुपाडे, महादेव वाघमोडे, शशिकांत खांडेकर, पारूबाई वाघमोडे, अश्विनी लवटे हे सदस्य बिनविरोध झाले. एका जागेसाठी निवडणूक लागली, मात्र या निवडणुकीत आता औपचारिकता राहिली.

निवडणुकीपूर्वी अनेक मतदारांनी त्यांच्यावर असलेले वैयक्तिक कर्ज किंवा इतर गोष्टींची पूर्तता करावी, अशी मागणी केली; मात्र प्रदीप खांडेकर यांच्या नियोजनबद्ध कौशल्याने ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध झाल्यामुळे निवडणुकीत आर्थिक लूट करणाऱ्या मतदारांना मात्र चपराक बसली. गावातील सर्व घटकांना सोबत घेऊन केलेले काम व आमदार समाधान आवताडे यांनी दिलेली आपल्याला सभापतिपदाची संधी याचा वापर करून योग्य समतोल राखत राजकारण केल्यामुळे सलग २५ व्या वर्षीही गावच्या राजकारणाची सूत्रे आमच्या घराभोवती फिरत राहिली.