मराठा आरक्षणासाठी राज्यात जोरदार आंदोलन सुरू आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातून मनोज जरांगे यांना पाठिंबा मिळत आहे. राज्याच्या अनेक भागात आंदोलन सुरू आहे. त्यांच्या उपोषणचा आजचा सहावा दिवस आहे. मनोज जरांगे पाटील यांची तब्येत दिवसेंदिवस खालावत चालली आहे.
अनेक लोक त्यांना भेटण्यासाठी येत आहेत. भेटीसाठी आलेल्या आरोग्यसेविकांनी जरांगे पाटील यांना उपचारांची गरज असल्याचं म्हटलं आहे. पण हे सांगत असतानाच त्या आरोग्यसेविकेला आपले अश्रू अनावर झाले. जरांगे यांची परिस्थीती पाहून त्यांना रडू कोसळलं. रडत रडत त्यांनी मनोज जरांगे यांना उपचारांची गरज असल्याचं सांगितलं आहे.
नांदेडहून आलेल्या रेखा पाटील यांना मनोज जरांगे यांची खालावलेली प्रकृती पाहून अश्रूंचा बांध फुटला. सरकार मनोज जरांगे यांचा जीवच घ्यायचा आहे, असा संतप्त सवाल रेखा पाटील यांनी केला आहे.
तर सरकारने गेल्या ४० दिवस काय केलं. सरकारला जरांगे भाऊंचा जीवच घ्यायचा आहे. ४० दिवसांची मुदत दिली होती, त्यावेळी त्यांनी काहीच नाही केलं. साधी एक बैठकही नाही घेतली. यांना पुरावे हवे होते, त्यांना पुरावे देखील दिले आहेत. आम्ही काय पाकिस्तानी आहोत का? असा सवालही रेखा पाटील यांनी सरकारला केला आहे.
‘मनोज जरांगे यांची एक एक पेशी मरायला लागली आहे. त्यांच्या हृदयाला रक्तपुरवठा होत नाही. त्यांची प्रकृती खालावत चालली आहे. त्यांचा बीपी खूप लो झाला आहे. त्यांचा तातडीने सलाईन लावणे गरजेचं आहे. अन्यथा माझ्या भावाचं काहीही होऊ शकतं. तुम्ही सगळं बंद करा आणि माझ्या भावाचा जीव वाचवण्याचं बघा, असंही त्यांनी यावेळी म्हटलं आहे.
मनोज जरांगे यांना वैद्यकीय मदतीची गरज आहे. आपण बघ्याची भूमिका घेणे अत्यंत मुर्खपणा ठरु शकतो. आपण त्यांचा जीव घ्यायचा का? त्यानंतर आरक्षण घेऊन करायचं काय? माझा भाऊ आरक्षण पाहायला जिवंत राहिला पाहिजे. तो तडफडून मरत आहेत, हे बघत राहायचं का? असंही त्यांनी म्हटलं आहे.
