मराठा आरक्षण आंदोलन चिघळलं; NCP आमदारांचा बंगला आणि गाड्या पेटवल्या, पाहा VIDEO

बीडच्या माजलगावात मराठा आंदोलन चिघळलं आहे. माजलगावमधील राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंके यांच्या बंगल्यावर दगडफेक करण्यात आलीये. आंदोलकांनी सोळंके यांच्या बंगल्याच्या गेटवर लाथा मारल्यात. या घटनेचा व्हिडीओ देखील समोर आलाय.

बंगला पेटवला

माजलगावमधील मराठा आंदोलनाला पुढे हिंसक वळण लागलं आहे. आंदोलकांनी आक्रमक होत सोळंके यांच्या बंगल्याला देखील आग लावली आहे. संपूर्ण बंगल्यात आग पसरल्याने धूराचे लोट हवेत दूरवर पसरलेत. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडालीये.

मराठा आंदोलकांनी सुरुवातीला सोळंके यांच्या घरावर मोठी दगडफेक केली. त्यानंतर बंगल्यासमोर उभी असलेली वाहने आणि बंगला देखली जाळला.

पहिल्या टप्प्यातील कुणबी प्रमाणपत्र वाटपास उद्यापासून सुरुवात

राज्यभरात मराठा आरक्षणाचा प्रश्न पेटलेला असताना शिंदे समितीच्या बैठकीत मोठा निर्णय घेतला गेलाय. पहिल्या टप्प्यातील कुणबी प्रमाणपत्र वाटपास उद्यापासून सुरुवात केली जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

समितीकडे उपलब्ध असलेल्या माहितीनुसार, सरकार तत्काळ कुणबी प्रमाणपत्र वाटपाला सुरुवात करणार आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळलीये.