कोल्हापुर जिल्ह्यात विधानसभेच्या दहा जागा लढवण्याची भाजपची तयारी…

कोल्हापूर जिल्ह्यातील विधानसभेच्या दहा मतदारसंघांतून लढण्याची भारतीय जनता पक्षाची तयारी आहे. परंतु राज्यात महायुती झाली असल्याने जागा वाटपाचा जो काही निर्णय होईल, तो आघाडीधर्म म्हणून पाळला जाईल, असे खा.धनंजय महाडिक यांनी सांगितले.कोल्हापूर जिल्ह्यात भाजने विधानसभेच्या किती जागा मागितल्या आहेत, असे विचारले असता महाडिक म्हणाले की, आमची तयारी दहाही जागा लढविण्याची आहे.

मात्र, राज्यात महायुती झाली असल्याने भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांचे नेते जो निर्णय घेतील तो मान्य असेल. कोणाला किती जागा मिळतील हे लवकरच कळेल. आम्ही जागा वाटप आणि उमेदवारांची नावे लवकर जाहीर करावीत असा आग्रह वरिष्ठ नेत्यांकडे धरला आहे.केंद्र व राज्य सरकारने अतिशय चांगले काम केल्यानंतरही लोकसभेला जागा कमी मिळाल्याचे सांगत काँग्रेस पक्षाने खोटा नॅरेटिव्ह तयार केला. संविधान बदलणार असा खोटा प्रचार केला. सरकारचे निर्णय जनतेपर्यंत पोहचविण्यात आम्ही कमी पडलो, खोटा प्रचार करण्यात काँग्रेसची मंडळी यशस्वी झाली, असे महाडिक यांनी सांगितले.