भारत पाकिस्तानमध्ये होणार का फायनल सामना?

वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लिजेंड्स 2024 चा सेमीफायनल सामना आज खेळवला जाणार आहे. पहिला सामना पाकिस्तान चॅम्पियन्स आणि वेस्ट इंडिज चॅम्पियन्स यांच्यात संध्याकाळी 5 वाजता होणार आहे.तर दुसरा सामना भारत चॅम्पियन्स आणि ऑस्ट्रेलिया चॅम्पियन्स यांच्यात होणार आहे.

हे दोन्ही सामने इंग्लंडमधील नॉर्थहॅम्प्टनच्या काउंटी क्रिकेट मैदानावर होणार आहेत. दोन्ही सामन्यातील विजयी संघ उद्या रात्री 9 वाजता विजेतेपदाचा सामना खेळणार आहे. जर भारत आणि पाकिस्तानने हा सामना जिंकला तर प्रेक्षकांना दोघांमधील विजेतेपदाच्या लढाईचा आनंद घेता येईल. भारत चॅम्पियन्सने पहिल्या फेरीत चांगली कामगिरी केलेली नाही.

भारताने पहिल्या फेरीत इंग्लंड चॅम्पियन्स आणि वेस्ट इंडिज चॅम्पियन्सचा पराभव करून चांगली सुरुवात केली होती, पण पुढच्या 3 सामन्यांमध्ये भारत चॅम्पियन्सला पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका चॅम्पियन्सविरुद्ध पराभवाला सामोरे जावे लागले. भारत चॅम्पियन्सला अंतिम फेरी गाठण्यासाठी हा सामना कोणत्याही किंमतीत जिंकावा लागेल. ऑस्ट्रेलिया चॅम्पियन्सने या स्पर्धेत आतापर्यंत फक्त 1 सामना गमावला आहे.

पहिल्या सामन्यात पाकिस्तान चॅम्पियन्सकडून संघाचा पराभव झाला होता. यानंतर ऑस्ट्रेलिया चॅम्पियन्सने पुनरागमन करत दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, भारत आणि वेस्ट इंडिज चॅम्पियन्सचा पराभव केला. चॅम्पियन्स पॉइंट्स टेबलमध्ये अव्वल स्थान मिळवत ऑस्ट्रेलियाने उपांत्य फेरी गाठली आहे. तर, भारत चॅम्पियन्सने चौथ्या स्थानावर राहून उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे.