वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील काँक्रीटीकरणाचे काम जवळपास पूर्ण होत आले आहे. वर्सोवा ते हॉटेल दिल्ली दरबारदरम्यानच्या मार्गिकेचे काम या आठवड्यात पूर्ण होणार असून या पट्ट्यामध्ये होणारी वाहतूककोंडी सुटण्याची अपेक्षा आहे. काँक्रीटीकरण पूर्ण होत असल्याने मेअखेरीस या महामार्गावरून वाहतूक सुसाट सुरू होण्याची चिन्हे आहेत.
मुंबई-अहमदाबाद (Mumbai-Ahmedabad) या राष्ट्रीय महामार्गाच्या काँक्रीटीकरणाचे काम डिसेंबर २०२३ मध्ये हाती घेण्यात आले होते. मात्र या कामामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडीला सामोरे जावे लागत होते. परंतु मार्चअखेर किंवा एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापर्यंत चिल्हार फाटा ते वर्सोवा काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे पालघर येथून ठाणे येथे दोन तासांमध्ये पोहोचणे आता शक्य झाले आहे.
पालघर जिल्ह्यातील उड्डाणपुलांची कामे जवळपास दहा-बारा महिन्यांपूर्वीच पूर्ण झाली आहेत. मात्र या पुलाखालून क्रॉसिंग करण्यासाठी वाहनांना प्रतिबंध करण्यात आला होता. या ठिकाणी क्रॉसिंग करताना अनेक अपघात झाले आहेत. मात्र आता क्रॉसिंग करण्यासाठी दोन्ही बाजूंनी सर्विस रस्त्यावर स्पीड ब्रेकर असणे गरजेचे आहे.
तलासरी ते दहिसर चेकनाका या दरम्यान १२० किमी. अंतरावर गेल्या दीड वर्षांपासून काँक्रीटीकरणाचे काम सुरू आहे. यामध्ये अनेक ठिकाणी काँक्रिटीकरण व्यवस्थित न झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात अपघात झाले. या पार्श्वभूमीवर पुन्हा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून काँक्रिटीकरणावर एपॉक्सी थर टाकण्याचे काम सुरू आहे. दहिसर ते घोडबंदरकडे जाणाऱ्या १.२० किमी. लांबीच्या एका मार्गिकेचे काँक्रीटीकरण अखेरच्या टप्प्यात आले आहे. महामार्गाचे महाराष्ट्रातील काँक्रीटीकरणाचे काम ९७ टक्के पूर्ण झाले आहे तर दुसऱ्या बाजूला या मार्गावरील प्रमुख चार उड्डाणपुलांची काम मेअखेरच्या आठवड्यात पूर्ण होणे अपेक्षित आहे.