इचलकरंजी शहरात अनेक काही दिवसांपासून स्वच्छतेच्या तक्रारी खूप वाढलेल्या आहेत. त्यामुळे नागरिकांना अनेक आजारांचा सामना करावा लागत आहे. नागरिकांमधून नाराजीचा सूर जोर देत आहे. याच पाश्वभूमीवर आयुक्त तथा प्रशासक ओमप्रकाश दिवटे यांनी गुरुवारी शहरातील विविध भागांना प्रत्यक्ष भेटी देऊन पाहणी केली.
यावेळी कामाच्या वेळेत अन्यत्र फिरणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्यांनी समज दिली. त्याचबरोबर नागरिकांशी संवाद साधत चर्चा करत कचरा घंटागाडीतच टाकण्याबाबत सूचना केल्या. शहरातील काही भागात घंटागाड्या येत नाहीत, कचरा वेळेवर उठाव होत नाही, कचऱ्याचे ढिग साचले आहेत, अशा विविध प्रकारच्या तक्रारी महापालिका प्रशासनाला प्राप्त झाल्या होत्या.
या तक्रारींच्या अनुषंगाने गुरुवारी आयुक्त दिवटे यांनी अचानकपणे काही भागांना भेटी दिल्या. त्यावेळी सकाळी आठ वाजताच चहासाठी सुट्टी केलेल्या कामगारांना बोलावून घेत त्यांनी सक्त समज दिली. तसेच भेट दिलेल्या ठिकाणी नागरिकांशी हितगुज करत घरातील अथवा दुकानातील कचरा घंटागाडीमध्येच टाकण्याबाबत सूचना केल्या. यावेळी प्रभागातील सफाई कर्मचारी बरेच दिवस गैरहजर असल्याने स्वच्छतेचे काम होत नसल्याचे नागरिकांनी सांगितल्यावर संबंधित कर्मचाऱ्यांच्या निलंबनाचे आदेश तातडीने काढण्याचे आदेश आरोग्याधिकारी डॉ. सुनिलदत्त संगेवार यांना दिले.