सरकार जनतेला फसवत जयंत पाटील …

‘हे सरकार अर्थसंकल्पाच्या माध्यमातून जनतेला फसवत असल्याचे आम्ही वारंवार व गेले काही दिवस सांगत आहोत.त्यावर भारताचे नियंत्रक आणि महालेखा परीक्षकांनी अर्थात ‘कॅग’च्या अहवालाने शिक्कामोर्तब केला,” अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली.

ते म्हणाले, की अर्थसंकल्पीय चर्चेतील भाषणात मी राज्यात मालमत्ता निर्मिती होत नसल्याबद्दल राज्याचे लक्ष वेधले होते. नेमकी तीच बाब देशातील सर्वोच्च घटनात्मक यंत्रणा असलेल्या ‘कॅग’च्या अहवालात मांडली गेली आहे. या भाषणात मी असेही नमूद केले होते की राज्य सरकार बेदरकार पद्धतीने उधळपट्टी करत असून हा अर्थसंकल्प वास्तवापासून दूर आहे, अगदी तेच निरीक्षण महालेखा परीक्षकांनी नोंदवले असून ‘अर्थसंकल्प वास्तववादी असावा’ अशी सूचना केली असल्याचे त्यांनी सांगितले.
ते म्हणाले, ”आम्ही सर्व लोक वारंवार हे सरकार अर्थसंकल्पाच्या माध्यमातून जनतेला फसवत असल्याचे गेले काही दिवस सांगत आहोत. त्यावर काल सभागृहाच्या पटलावर ठेवलेल्या कॅगच्या अहवालाने शिक्कामोर्तब केले आहे.

राज्य सरकार वाटत असलेली अनावश्यक अनुदाने कमी करावीत, मालमत्ता निर्मितीकडे लक्ष पुरवावे, वाढीव पुरवणी मागण्या सादर करताना करताना त्याचे समर्थन करता यावे आणि वर्षाच्या शेवटच्या महिन्यात खर्च करण्याची पध्दत थांबवावी”, अशा कडक शब्दांत ‘कॅग’ने शिंदे-फडणवीस-पवार सरकारला सुनावले असल्याचे त्यांनी सांगितले.पुढची पिढी भिकेला लागली तरी चालेल, पण वाडवडिलांनी कष्टाने कमावलेले सर्व फुकून टाकून फक्त आजच्या दिवशी कशी मौजमजा करता येईल, असाच सध्याच्या राज्यकर्त्यांचा राज्य चालवतानाचा दृष्टिकोन आहे, अशी जोरदार टीका आमदार पाटील यांनी सरकारवर केली.