राज्यात सध्या २०२३ मधील रिक्त असलेल्या १७ हजार ४७१ पोलिसांची भरती सुरू असून १ सप्टेंबरपूर्वी ही भरती संपणार आहे. त्यानंतर १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२४ या काळातील अंदाजे सात हजार पोलिसांची भरती होईल, अशी माहिती गृह विभागातील वरिष्ठ सूत्रांनी दिली.राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात आतापर्यंत दोनवेळा पोलिस भरती पार पडली आहे.
त्यांच्याच कार्यकाळात १९७६ चा गृह विभागाचा आकृतीबंध बदलून नवीन तयार केला. वाढती गुन्हेगारी, शहर-जिल्ह्यांचा विस्तार व वाढलेली लोकसंख्या आणि पोलिस ठाण्यांची गरज ओळखून त्यांनी हा ऐतिहासिक निर्णय घेतला. त्यानुसार मागील अडीच-तीन वर्षात ३० हजार पोलिसांची भरती झाली आहे.
राज्यातील १० पोलिस प्रशिक्षण केंद्रांची क्षमता देखील आता वाढविण्यात आली असून सध्या तेथील नवप्रविष्ठ पोलिस शिपायांचे प्रशिक्षण सप्टेंबरमध्ये संपणार आहे.तत्पूर्वी, १ सप्टेंबरपर्यंत सध्याची १४ हजार ४७१ पदांची पोलिस भरती पूर्ण करण्याचे आदेश गृह विभागाने सर्वच जिल्ह्याच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत.
आतापर्यंत २५ जिल्ह्यात पोलिस शिपाई, आठ जिल्ह्यात चालक शिपाई व पाच जिल्ह्यात बॅण्डसमॅनची लेखी परीक्षा घेण्यात आली असून उर्वरित जिल्ह्यांमध्ये देखील पावसाची स्थिती पाहून लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. त्यानंतर नवीन पोलिस भरतीला सुरवात होणार आहे.