सांगोल्यातील नऊ गावांना होणार पिण्याच्या पाण्याचा व सिंचनाचा लाभ

म्हैसाळ प्रकल्पातून कोरडा नदीवरील सर्व को.प. बंधारे व वंचित गावातील पाझर तलाव, गाव तलाव व इतर पाणीसाठे भरून देण्याची शिवसेनेचे आमदार शहाजी बापू पाटील यांनी मागणी केली होती. म्हैसाळ प्रकल्पाच्या सांगोला वितरिका क्र. 1 वरील सिंचन क्षेत्र 459 हेक्टर आहे. सदर वितरीकेचे काम शंभर टक्के पूर्ण झाले आहे. या वितरीकेमुळे सांगोला तालुक्यातील डिकसळ गावातील 459 हे. क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. शिंगनहळी वितरीकेवरून सांगोला तालुक्यातील सोनंद गावातील 72 हे. क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे.

म्हैसाळ प्रकल्पाच्या जत मुख्य कालव्यातून थेट बंदिस्त नलिकेद्वारे सांगोला तालुक्यातील गळवेवाडी पासून वाढेगाव पर्यंतचे पंधरा बंधारे व नराळे, घेरडी व हंगीरगे असे तीन तलाव भरून देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. बंदिस्त निलिकेद्वारे 15 को.प. बंधारे भरून दिल्यास कोरडा नदी पुनर्जीवित होऊन नदीलगतच्या नऊ गावांना पिण्याच्या पाण्याचा व सिंचनाचा लाभ होणार आहे.

या प्रस्तावित कामासाठी अंदाजे 91 कोटी 62 लाख रुपयांचा खर्च अपेक्षित असल्याची माहिती शिवसेनेचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी दिली. म्हैसाळ प्रकल्पाच्या पाचव्या मंजूर सुप्रमानुसार मंजूर पाणी वापरापैकी एक टीएमपी पीएमसी पाण्याचा वापर लाभक्षेत्रातील तलाव व को.प. बंधारे भरण्यासाठी राखीव आहे. पाणी वापरातून सांगोला तालुक्यातील कोरडा नदीवरील सर्व को.प. बंधारे भरून देण्यासाठी जर मुख्य कालव्यातून थेट बंदिस्त नलिकेद्वारे भरण्यासाठीच्या वितरण व्यवस्थेच्या कामाचा अहवाल तयार करण्यात आलेला आहे.