येथील राजारामबापू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या इम्पॉवर्ड ऑटोनॉमस इन्स्टिटयूटला एआयसीटीई कडून नवीन अभ्यासक्रम सुरू करण्यास मान्यता मिळाली असून इंडस्ट्रीमध्ये मागणी असणारे कोर्सेस आरआयटी महाविद्यालयामध्ये उपलब्ध झाल्यामुळे विद्यार्थ्यांना करिअर च्या नवीन संधी उपलब्ध होणार आहेत, अशी माहिती कासेगाव शिक्षण संस्थेचे सचिव प्राचार्य आर. डी. सावंत यांनी दिली. महाविद्यालयाचे संचालक डॉ. पी. व्ही. कडोले म्हणाले की, ज्या नवीन कोर्सेसना एआयसीटीईकडून परवानगी मिळाली आहे त्याची प्रवेश क्षमता बीबीए १२०, बीसीए ४०, एमसीए ६० आणि डिप्लोमा इन मेकेट्रॉनिकस ६० अशी आहे. याबरोबरच बी. टेक च्या रोबोटिक्स अँड ऑटोमेशन या शाखेची आणि कॉम्प्युटर सायन्स इंजीनियरिंग या शाखेची प्रवेश क्षमता वाढविण्यास एआयसीटीईची परवानगी मिळाली आहे.
या नवीन कोर्सेस बरोबरच एआयसीटीई ने आरआयटी च्या द्विनिंग प्रोग्रॅम विथ फॉरेन युनिव्हर्सिटीला देखील मान्यता दिली असून यामुळे द्विनिंग प्रोग्रॅम ला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना आरआयटी मधील यूजी पीजी आणि एमबीए कोर्सेस आरआयटी व परदेशातील विद्यापीठ अशा दोन्ही ठिकाणी पूर्ण करण्याची सोय उपलब्ध असणार आहे. तसेच आरआयटीचा ऑस्ट्रेलिया, फ्रान्स, जर्मनी, यूएसए, यूके, नेदरलँड, मलेशिया, तैवान, इंडोनेशिया, जॉर्जिया आणि रशिया या देशातील नामांकित २६ विद्यापीठांशी करार असल्यामुळे या करारांतर्गत स्टुडन्ट एक्सचेंज प्रोग्रॅम, सेमिस्टर इन ऍब्रॉड, इंटरनॅशनल इंटर्नशिप आणि मास्टर्स इन ऍब्रॉड यासारखे उपक्रम अगोदर पासून सुरु आहेत.
द्विनिंग प्रोग्रॅम विथ फॉरेन युनिव्हर्सिटी मुळे आता विद्यार्थ्यांना या परदेशी विद्यापीठातील यूजी, पीजी आणि एमबीए डिग्री मिळवणे अधिकच सोपे झाले आहे. यामध्ये दोन वर्ष आरआयटीमध्ये आणि दोन वर्ष परदेशी विद्यापीठात शिक्षण घेऊन विद्यार्थ्यांना परदेशी विद्यापीठाची यूजी डिग्री मिळणार आहे. दोन वर्ष आरआयटीमध्ये आणि तीन वर्ष परदेशी विद्यापीठात शिक्षण घेऊन यूजी आणि एमएस या दोन्ही डिग्री मिळणार आहे. तसेच एक वर्ष आरआयटीत आणि एक वर्ष परदेशी विद्यापीठात शिक्षण घेऊन एमबीए किंवा पीजी डिग्री मिळणार आहे.
अशा प्रकारच्या ट्रिनिंग विथ फॉरेन युनिव्हर्सिटी कोर्सेसची मान्यता असणारे महाराष्ट्रातील आरआयटी हे पहिले महाविद्यालय आहे. डिप्लोमाच्या कॉम्प्युटर हार्डवेअर अँड मेंटेनन्स या विद्याशाखेतील विद्यार्थी प्रवेश क्षमता कंप्यूटर इंजिनिअरिंग या विद्याशाखेत विलीनीकरण करून ती क्षमता १५० पर्यंत वाढविण्यास एआयसीटीईने परवानगी दिली आहे. हे नवीन कोर्सेस सुरू करण्यासाठी आरआयटीच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष भगतसिंह पाटील, कासेगाव शिक्षण संस्थेचे सचिव प्राचार्य आर. डी. सावंत आणि नियामक मंडळ सदस्य शामराव पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. याप्रसंगी डॉ. एल. एम. जुगुळकर आणि रजिस्ट्रार सारिका पाटील उपस्थित होते.