विट्यात भर दुपारी दीड लाखाची घरफोडी

विट्यात भर दुपारी अज्ञात चोरट्यांनी घरफोडी केली. यात दीड लाख रुपये किमतीचे गंठण आणि पाच हजार रुपयांची रोकड असा एकूण १ लाख ५५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल लंपास केला. ही घटना गुरुवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडली.याप्रकरणी नितीन शेवाळकर (वय २८, रा. रेवा बिल्डींग, कराड रोड, विटा) यांनी विटा पोलिसांत फिर्याद दिली आहे. राधिका शेवाळकर या कराड रस्त्यावरील रेवा बिल्डींगमध्ये राहण्यास आहेत.

गुरुवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास शेवाळकर या त्यांच्या मुलीला शाळेतून घरी आणण्यासाठी गेल्या होत्या. यावेळी दोन अज्ञात इसमांनी त्यांच्या घरात घुसून दीड लाख रुपये किमतीचे एक काळे मण्यातील सोन्याचे पदक असलेले सोन्याच्या साखळीतील ५ तोळे ९४० ग्रॅम वजनाचे गंठण, पाच हजार रुपयांची रोकड, असा एक लाख ५५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी लांबवल्याचे राधिका शेवाळकर यांनी फिर्यादीत म्हटले आहे. या घटनेची विटा पोलिसांत नोंद झाली आहे. अधिक तपास हवालदार मनोज जाधव करीत आहेत.