इचलकरंजी शहरातील अस्वच्छतेचा प्रश्न सुटणार कधी?

वस्त्रनगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इचलकरंजी शहरात पाण्याची तीव्र टंचाई तर जाणवतेच त्याचबरोबर या ठिकाणी स्वच्छतेचा प्रश्न देखील खूपच गंभीर बनू लागला आहे. इचलकरंजी शहरातील कचऱ्याची समस्या संपता संपेना झाली आहे. कोट्यावधी रुपये खर्च करूनही गल्लोगल्ली कचऱ्याचे ढीग साचलेले दिसून येतात. तर काही वार्डातील खासगी मक्तेदाराकडून अनेक महिन्यांपासून गटारीची व प्रभागाची स्वच्छता करण्यात आली नसल्याचे निदर्शनास येत आहे.

तर तत्कालीन नगरपालिकेने स्वच्छ भारत अभियानांतर्गत ३९ लाख रुपये खर्च करून खरेदी केलेले मुख्य रस्त्यांवरील डस्टबीन गायब झाले आहेत. काही ठिकाणी शिल्लक असणारे डस्टबिन उलटे लटकताना दिसत आहे. त्यामुळे नागरिकांनी कचरा टाकायचा कोठे हा प्रश्न निर्माण झाला आहे. तत्कालीन नगरपालिका प्रशासनाने स्वच्छ भारत अभियानांतर्गत शहरातील अंतर्गत स्वच्छतेसाठी चौदाव्या वित्त आयोगातून कचरा गोळा करण्यासाठी ३८ लाख ९५ हजार रुपयांच्या ३०० डस्टबिन खरेदी करून स्टेशन रोड ते नदीवेस नाका व कोल्हापूर नाका ते राजवाडा चौक या प्रमुख रस्त्यांवर प्रत्येक ५०० मीटरवर बसविले होते.

ते सध्या गायब झाले असून कुठेतरी एखादा डस्टबिन दिसून येत आहे. त्यानंतर पुन्हा स्टीलचे डस्टबिन खरेदी करून शहरातील विविध भागांमध्ये व गर्दीच्या ठिकाणी लावण्यात आले होते ते डस्टबिन ही गायब झाले असून काही ठिकाणी असणारे डस्टबिन हे उलटे लटकताना दिसत आहेत. त्यामुळे कचरा टाकायचा कसा असा नागरिकांना प्रश्न पडला आहे.