कालपासून दहावीची परीक्षा सुरु झालेली आहे. प्रत्येक परीक्षा केंद्रावर कडेकोट बंदोबस्त गैरप्रकार होऊ नये यासाठी ठेवण्यात आलेला आहे. इचलकरंजी शहरात एकूण १६ परीक्षा केंद्रे असून ९ हजार ६१७ विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था करण्यात आली आहे. मराठी विषयाच्या पेपरने परीक्षेला प्रारंभ झाला आहे. कॉपीमुक्त परीक्षेसह परीक्षेतील गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी यंदाही बोर्डाने काही पावले उचलली आहेत. प्रश्नपत्रिका परीक्षा केंद्रांवर पोहोच करणाऱ्या रनर वर खास जबाबदारी सोपविण्यात आली असून प्रत्येक परीक्षा केंद्रावर परीक्षा सुरू होण्यापूर्वी एक तास आणि परीक्षेनंतर एक तास असे एकूण पाच तास बैठे पथके नेमण्यात आली आहेत. बारावीपाठोपाठ दहावीच्या परीक्षेसाठीही कडक चे व शिस्तबध्द नियोजन करण्यात आले आहे.
शहर व भागात दोन कस्टडीअंतर्गत एकूण १६ केंद्रांवर बैठक व्यवस्थेचे नियोजन करण्यात आले आहे. परीक्षेसाठी येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याची अंगझडती घेऊनच त्यांना केंद्रात प्रवेश दिला जात होता. परीक्षा केंद्र परिसरातील १०० मीटर अंतरावर असलेले झेरॉक्स सेंटर, पानशॉप, टंकलेखन, संगणक सेंटर, इंटरनेट कॅफे बंद करण्यात आले होते. प्रत्येक केंद्रावर सकाळपासून विद्यार्थी- विद्यार्थीनींसह पालकांनी मोठी गर्दी केली होती. आसन व्यवस्थेची खात्री करुन विद्यार्थी- विद्यार्थीनी आपल्या आसनस्थानी जात होते. अनुचित प्रकार घडून नये व कॉपी प्रकाराला आळा बसावा यासाठी केंद्र परिसरात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.