कोल्हापूरसह पुणे व राज्यात सुरू असलेली अतिवृष्टी, महापुराच्या परिस्थितीमुळे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा महाराष्ट्र दौरा पुढे ढकलण्यात आला आहे. राष्ट्रपतींच्या कार्यालयातून राज्याच्या मुख्य सचिवांना याबाबतचे पत्र शुक्रवारी सायंकाळी पाठविण्यात आले. राष्ट्रपतींचा दौरा सध्या तरी रद्द झाल्याने तयारीत गुंतलेल्या सर्वच शासकीय यंत्रणेने सुटकेचा श्वास सोडला. आता त्यांना कोल्हापुरातील पूरस्थितीवर लक्ष केंद्रित करता येणार आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या २८ ते ३० तारखेदरम्यान महाराष्ट्र दौऱ्यावर येणार होत्या. त्यांचा सर्वात पहिला दौरा रविवारी काेल्हापुरात होता.
यादिवशी त्या अंबाबाईचे दर्शन घेऊन वारणानगर येथील कार्यक्रमाला जाणार होत्या. त्यांच्या दौऱ्यानिमित्त गेल्या आठ दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालय, महसूल, पोलिस, सार्वजनिक बांधकाम, रस्ते विकास महामंडळ असे तलाठ्यापासून ते उच्चपदस्थ अधिकाऱ्यांपर्यंतची यंत्रणा तयारीत गुंतली होती.