भटक्या कुत्र्यांची दहशत! ८० जणांना श्वानदंश…

सध्या भटक्या कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. शिरोली गावात भटक्या कुत्र्यांची दहशत वाढली असून, गेल्या दोन महिन्यांत ८० जणांना कुत्र्यांच्या चावा घेऊन जखमी केले आहे. कुत्र्यांकडूनरात्री वाहनांचापाठलाग करणे, अंगावर धाऊन जाणे, अचानक वाहनांच्या आडवे येणे अपघातास कारणीभूत ठरत आहेत. त्यांचा बंदोबस्त कोणी करायचा, असा प्रश्न पडला आहे. वयोवृद्ध, लहान मुले, तसेच महिलांना रस्त्यावरून चालताना भटक्या कुत्र्यांची भीती आहे. गावातील काही भागांत चौकाचौकांत, महामार्गालगत सेवामार्गावर रात्री भटकी कुत्री अगदी झुंडीने उभी असतात. दुचाकी आली की एकामागून एक कुत्री त्यामागे लागत असल्याने अपघातासारखे प्रसंगही घडले आहेत.


रात्री दहानंतर शिरोली फाटा, सांगली फाटा, प्राथमिक आरोग्य केंद्र, मराठी शाळा, माळवाडी, शास्त्रीनगर, हौसिंग सोसायटी, मकाजी पाटील मळा, विलासनगर, कोल्हापूर एक्सल, एमआयडीसी पहिला फाटा प्रमुख भागांत भटक्या कुत्र्यांचे साम्राज्य आहे . काही भागांत कुत्र्यांनी जनावरांना आपले लक्ष्य केले आहे. पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतल्यानंतर प्रशासकीय यंत्रणा तात्पुरती जागी होती.