तेल कंपन्यांनी LPG गॅस सिलेंडरच्या दरात बदल केले आहेत. हा बदल व्यावसायिक वापरासाठीच्या सिलेंडरच्या दरात आहे. 19 किलोच्या कमर्शियल LPG सिलेंडरची किंमत कमी झाली आहे.आता हा सिलेंडर 24 रुपयांनी स्वस्त झाला आहे. मुंबईत आता हा सिलेंडर 1674.50 रुपयांना मिळेल. नवीन दर 1 जूनपासून लागू झाले आहेत. कमर्शियल LPG सिलेंडरचा वापर हा हॉटेल, रेस्टॉरंट आणि इतर व्यावसायिक ठिकाणी केला जातो.
तेल कंपन्यांनी कमर्शियल LPG सिलेंडरच्या किमती कमी करण्याची घोषणा केली आहे. “आम्ही दर कमी केले आहेत,” असे कंपन्यांनी सांगितले आहे. दिल्लीमध्ये 19 किलोच्या कमर्शियल LPG सिलेंडरची किंमत 1 जूनपासून 1723.50 रुपये आहे.
मे 2025 मध्ये, आंतरराष्ट्रीय किमतींनुसार मासिक सुधारणांमध्ये व्यावसायिक एलपीजीचे दर प्रति 19 किलो सिलिंडर सुमारे 17 रुपयांनी कपात करण्यात आली होती. एप्रिलमध्ये 42 रुपयांची कपात केली गेली होती. त्यामुळे सलग तिसऱ्या महिन्यात व्यावसायिक वापराच्या एलपीजीच्या किंमतीमध्ये घट झाली आहे.
घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात कोणताही बदल केलेला नाही. गेल्या महिन्यातही घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात बदल करण्यात आला नव्हता. आज मुंबईत घरगुती गॅस सिलेंडरची किंमत ही 852.50 रुपये आहे. एप्रिल महिन्यात गॅस सिलेंडरच्या दरात तब्बल 50 रुपयांनी वाढ केली गेली होती. त्याचा फटका सर्वसामान्यांसहित उज्वला योजनेच्या लाभार्थ्यांनाही बसला होता.