सांगलीचा स्मार्ट सिटीत समावेश का करण्यात आला नाही. आमच्या विमानतळासाठी अर्थसंकल्पात तरतूद का करण्यात आली नाही. टेंभू आणि म्हैसाळ विस्तारित योजनांसाठी ए.आय.बी.पी. योजनेतून निधी देण्यात सरकार आखडता हात का घेत आहे, असा सवाल करत खासदार विशाल पाटील यांनी संसदेत हल्लाबोल केला.विशाल पाटील म्हणाले, सांगलीला अर्थसंकल्पातून काहीच मिळाले नाही.
दीड तासाच्या भाषणात एकदाही महाराष्ट्राचे नाव घेतले गेले नाही. आसाम, बिहारमधील महापुराचा उल्लेख झाला. महाराष्ट्रातील महापुराच्या नुकसानीवर त्या बोलल्या नाहीत. सांगली मतदारसंघाची अपेक्षा आहे स्मार्ट सिटीत येण्याची. इथे विमानतळाला निधी दिला नाही.बिहारमधील सिंचनासाठी तुम्ही निधीची तरतूद केली, मात्र टेंभू, म्हैसाळ योजनेचा उल्लेख करण्याची गरज तुम्हाला वाटली नाही.
कराचा ३७ टक्के हिस्सा महाराष्ट्रातून येतो, भारताच्या जीडीपीचा १४ टक्के हिस्सा महाराष्ट्रातून येतो. पाच ट्रिलियन इकॉनॉमीची स्वप्ने पाहताना त्यात एक ट्रिलियन वाटा महाराष्ट्राचा असला तरच ते शक्य होणार आहे. महाराष्ट्राच्या विकासाशिवाय भारताचा विकास अशक्य आहे.