ग्रामीण रुग्णालयातील कंत्राटी डॉक्टर – कर्मचारी यांचे बेमुदत कामबंद आंदोलन

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध विभागात कार्यरत असणारे वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांचे राज्यस्तरावर बेमुदत काम बंद आंदोलन सुरू असून त्याला पाठिंबा देण्यासाठी ग्रामीण रुग्णालय मंगळवेढा येथील विविध विभागातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांचेमार्फत बेमुदत कामबंद आंदोलनाचे निवेदन देण्यात आले.

सदर वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी गेल्या वीस वर्षापासून तुटपुंज्या मानधनावर काम करत असून कोरोना काळात याच कर्मचाऱ्यांनी घरदार, जीवाची परवा न करता आपले कर्तव्य चोख बजावले आहे. शासन सेवेत समायोजन करावे अशी त्यांची मागणी असून आझाद मैदान येथे पार पडलेल्या आक्रोश मोर्चामध्ये माननीय आरोग्य मंत्री यांनी दिलेले आश्वासन लेखी स्वरूपात प्राप्त होत नाही तोपर्यंत कामबंद आंदोलन करण्याचा पवित्रा त्यांनी घेतला आहे.

ज्याप्रमाणे इतर राज्यांमध्ये कंत्राटी कर्मचाऱ्यांचे समायोजन केले आहे त्याच पद्धतीने राज्य शासनाने देखील लवकरात लवकर समायोजन करण्याचा निर्णय घ्यावा अशी मागणी करण्यात येत आहे. या काम बंद आंदोलनाचा फटका रुग्णसेवेला बसणार आहे. सदर निवेदन देताना राष्ट्रीय बालस्वास्थ्य विभागाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. शिरीष कुलकर्णी, डॉ, धनश्री केंदळे, डॉ. ऋतुजा गायकवाड डॉ. अनिल चौगुले, डॉक्टर प्रवीण माने, आयुष वैद्यकीय अधिकारी डॉ. निखिल जोशी, रेवता स्वामी, क्षयरोग विभागाचे प्रल्हाद नाशिककर, मोहन राजगुरूऔषध निर्माण अधिकारी रेश्मा सरडे, अविनाश पट्टणशेट्टी परिचारिका सारिका कोळेकर सुरेखा खरात आदी उपस्थित होते.