राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सांगली विभागातील इस्लामपूर आगाराने श्रावण महिन्यामध्ये देव दर्शन घेण्याची सुवर्णसंधी प्रवाशांना उपलब्ध करून दिल्याची माहिती आगार व्यवस्थापक दिलीप ठोंबरे यांनी दिली. ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना शंभर टक्के, तर महिलांना ५० टक्के सवलतीच्या दरामध्ये या देवदर्शनांच्या सहलींचा आनंद घेता येणार आहे. यास नागरिकांचा प्रतिसादही चांगला मिळत आहे, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
या तीर्थक्षेत्र सहलीसाठी ११ मारुती दर्शन, औंधची यमाई, शिखर शिंगणापूर, गोंदवलेकर महाराज समाधी दर्शन, मार्लेश्वर, गणपतपुळे, पावस, दख्खनचा राजा ज्योतिबा, श्रीक्षेत्र बाळूमामा आदमापूर एकदिवसीय सहल असेल, तर पंढरपूर, तुळजापूर, अक्कलकोट ही सहल २ दिवसांची आहे. अष्टविनायक दर्शन सहल ३ दिवसांची असणार आहे. या सर्व देव- देवतांचे दर्शन घेण्याची संधी इस्लामपूर आगाराच्या वतीने उपलब्ध करण्यात आली आहे. या संधीचा लाभ भक्तांनी घ्यावा, असे आवाहन ठोंबरे यांनी केले आहे.