इचलकरंजीत वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या १०५७ वाहनधारकांवर कारवाई

काही दिवसांपूर्वी टेम्पोतून धोकादायकरित्या बिमाची वाहतूक करताना झालेल्या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. त्यानंतर वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश पोलिस उपअधिक्षकांनी दिले होते. त्या अनुषंगाने भविष्यात असे अपघात घडू नयेत यासाठी धोकादायकरित्या बिमांची वाहतूक करणाऱ्या ८१ वाहनांवर दंडात्मक कारवाई करत ५४ हजार ५०० रुपयांचा दंड वसुल केला आहे.

त्याचबरोबर भरधाव वेगाने वाहन चालविणे, ट्रिपल सीट वाहन चालविणे, विना परवाना, विना नंबरप्लेट वाहन चालविणे, सीट बेल्ट न लावणे, सिग्नल जंप करणे. वने वे तून वाहन चालविणे, बेशिस्त पार्किंग करणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई सुरु आहे. बेशिस्त पार्किंग, सिग्नल तोडणे आदींसह वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या १०५७ वाहनधारकांवर शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या वतीने कारवाई करत ८ लाख ३० हजार २५० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

तर मद्यप्राशन करुन वाहन चालविणाऱ्या ३८ जणांवर कारवाई करत गावभाग, शिवाजीनगर व शहापूर पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले असल्याची माहिती शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे सपोनि प्रशांत निशाणदार यांनी दिली.