डिग्रज बंधाऱ्याजवळ मगरीचा धोका!

कृष्णा नदीत ब्रह्मनाळ डोह ते डिग्रज बंधाऱ्यापर्यंत मोठ्या प्रमाणात मगरींचे वास्तव्य आढळून येत आहे. सध्या डिग्रज पुलाजवळ एक मोठी मगर गेले काही दिवस पात्राबाहेर मळीत येऊन पडते. वनविभागाने तत्काळ मगर पकडण्यासाठी उपाययोजना करावी, अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे. पाणी पात्रात गेले आहे. महापुरामुळे मोठ्या प्रमाणात जलचर प्राणी पात्राबाहेर आले होते. लहान-मोठ्या मगरींच्या राहण्यासाठीच्या घळी महापुरामुळे उद्ध्वस्त झाल्या आहेत. त्यामुळे या मगरी लगतच्या पोटमळी, मळी क्षेत्रात वावरताना दिसत आहेत. कसबे डिग्रज पुलाजवळ सध्या दहा फुटी मगर दिसून येत आहे.

सध्या मोटारींची दुरुस्ती करणे, कृष्णा नदीला आलेला पूर ओसरून शेती कामे करणे, स्वच्छता करणे यासाठी पुरुषांबरोबरच महिलाही पाणवठ्यावर जात असतात. पोहणाऱ्यांचीही गर्दी वाढली आहे. या सर्वांना मगरीचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे वनविभागाने मगर पकडण्याची मोहीम राबवावी, असे मागणी होत आहे. सांगली वनविभागाच्यावतीने डिग्रज परिसरात एक वनमजूर नेमले होते. ते मगरीवर लक्ष ठेवून असायचे; पण सध्या त्यांची बदली केल्याची चर्चा आहे.