कोल्हापूर जिल्ह्यात कुणबी दाखले देणाऱ्या समितीची यादी जाहीर करावी

कोल्हापूर जिल्ह्यात मराठा आरक्षणाच्या कुणबी नोंदी शोधण्यासाठी ज्या समित्या नियुक्त केल्या आहेत, त्यांची यादी जिल्हा प्रशासनाने जाहीर करावी किंवा जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी सत्कार समारंभ आणि कार्यक्रमातून बाहेर पडून ही यादी स्पष्ट करावी, अशी मागणी होत आहे. दरम्यान, शनिवारपर्यंत पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी अशा प्रकारची यादी लोकांसमोर आणली नाही. त्यामुळे मराठा समाजात नाराजी पसरली आहे.

यादी जाहीर करताना कोणत्या तालुक्यासाठी कोणते प्रांताधिकारी, तहसिलदार आणि समिती आहे, त्यांचे भ्रमणध्वनी क्रमांक, त्यांचे बसण्याचे ठिकाण, त्यांच्या रजा आणि दौरे असेही बोर्डावर लावण्यात यावे. नाहीतर मराठ्यांनी जावे आणि हेलपाटे मारुन यावे, असा प्रकार घडू नये याची दक्षता घ्यावी, अशी मागणी होत आहे. बहुतेक तालुक्यात अद्यापही नोंदी शोधण्याचे काम सुरु झालेले नाही. राज्यातील काही तालुक्यात तहसिलदार, नायब तहसिलदार, उपअधिक्षक भूमिलेख, दुय्यम निबंधक, गटविकास अधिकारी, गटशिक्षण अधिकारी, मुख्याधिकारी यांच्या नियुक्त्या झाल्याचे सांगण्यात येते. पण, कोल्हापूर जिल्ह्यात का नाही, असा संताप आहे.