हातकणंगलेत शाळेचे सील तोडल्याप्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल!

हातकणंगले तालुक्यातील कोरोची येथील न्यू जनरेशन इन्होवेटीव्ह स्कूल आणि न्यू मिलेनियम पब्लिक स्कूलच्या विजया मोहन वय 62 यांच्यासह चौघांवर कर्जापोटी फायनान्स कंपनीने जप्त केलेल्या शाळा इमारतीचे सील तोडून बेकायदेशीर प्रवेश केल्या प्रकरणी शहापूर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. प्रोफेक्टस कॅपिटल प्रा. लि. कंपनीचे मॅनेजर पंकज तानाजी पाटील यांनी फिर्याद दिलेली आहे.

प्रोफेक्टस कॅपिटल प्रा. लि. या बँकेने विजया मोहन व राम्यामोहन यांना न्यू जनरेशन इन्होवेटीव्ह स्कूल आणि न्यू मिलेनियम पब्लिक स्कूलच्या नूतनीकरणासाठी कोरोची येथील गट नंबर 773 वरील मिळकत तारण गहाण ठेवून तीन कोटी तीन लाख इतके कर्ज दिलेले होते आणि याच कर्जाचे हप्ते थकल्यामुळे बँकेने कायदेशीर कारवाई करत गट नंबर 773 व त्यावरील इमारतीवर जप्तीची कारवाई करत सील केली होती.

परंतु सील मिळकतीवरील सिक्युरिटी गार्ड यांना शिवीगाळ करत धमकी देत बाजूला ढकलून बँकेचे नोटीस व सील तोडून इमारतीत प्रवेश केला याप्रकरणी विजया मोहन यांच्यासह अन्य अनोळखी अशा चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.