हातकणंगले विधानसभा हा मतदार संघ काँग्रेसचा बालेकिल्ला होता. डॉ. मिणचेकर यांच्या दोन टर्म सोडल्या तर सातत्याने याठिकाणी काँग्रेसचेच वर्चस्व राहिले आहे. जयवंतराव आवळे २५ वर्ष, त्यांचे पुत्र राजूबाबा आवळे यांनी ५ वर्ष तर त्यांच्याच परिवारातील राजीव आवळे यांनी ५ वर्ष अशी ३५ वर्षे आवळे परिवाराने या मतदार संघावर हुकूमत गाजविली आहे. गतवेळी तिसऱ्या क्रमांकावर असलेले डॉ. अशोकराव माने यांनी या विधानसभा निवडणुकीत अनअपेक्षितपणे मताधिक्य घेत काँग्रेससह परिवर्तन आघाडीच्या उमेदवारांना जबर धक्का दिला. त्यांनी मागील ५ वर्षात गावागावात ठेवलेला लोकसंपर्क आणि लाडक्या बहिणींची साथ, त्याचबरोबर निवडणूक काळात परफेक्ट नियोजन करत विरोधकांचा कार्यक्रम केला.
हातकणंगले विधानसभा मतदारसंघात निवडणूक लागण्या पूर्वीपासूनच हा मतदारसंघ शिवसेनेला जाणार की भाजपकडे राहणार? हा वाद चव्हाट्यावर आला होता. खा. धैर्यशील माने शिवसेनेला मतदार संघ घेवून लाडकी बहिण योजना समितीचे अध्यक्ष अविनाश बनगे यांच्यासाठी प्रयत्नशील होते, तर हा मतदार संघ भाजपला सोडण्यासाठी निष्ठावंत गट आग्रही होता. परंतू, राज्यातील राजकिय जोडण्या आणि महायुतीतील घटक पक्षांना न्याय देण्यासाठी डॉ. विनय कोरे यांच्या भाजपचा सहयोगी पक्ष डॉ. विनय कोरे सावकार यांच्या जनसुराज्य पक्षाच्या वाट्याला हा मतदारसंघ गेला.
डॉ. माने यांच्या उमेदवारीला भाजपच्या निष्ठावंत गटाकडून कडाडून विरोध होता. तरी पक्षाने या विरोधाकडे दुर्लक्ष करत माने यांना उमेदवारी दिली. तर निष्ठावंतांची नाराजी दूर करण्यासाठी भाजप प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर, जिल्हा परिषदेचे ज्येष्ठ नेते अरुणराव इंगवले, डॉ. संजय पाटील यांनी निखराचे प्रयत्न केले आणि त्यांना यशही आले.
एका बाजूला मतदारसंघाच्या जागेवर दावे-प्रतिदावे होत असताना यामध्ये लक्ष न घालता अशोकराव माने यांनी जनसंपर्क वेगाने सुरू ठेवला. गावोगावी प्रमुख नेते, कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेण्यावर भर देत कोणत्याही परिस्थितीत महायुतीकडून माझीच उमेदवारी निश्चित आहे, असा ठाम विश्वास देत होते आणि तसेच घडलेही.