विविध उत्सवांतील मिरवणुकांमध्ये वापरल्या जाणाऱ्या लेसर किरणांमुळे डोळ्यांचे पडदे फाटण्याचे प्रमाण वाढले आहे. याविरोधात महाराष्ट्रभरातील नेत्रविकारतज्ज्ञांनी आवाज उठवायला सुरूवात केली आहे.पहिल्या टप्प्यात सांगली जिल्हा ऑप्थॉल्मॉजिस्ट संघटनेने लेसरला विरोधाची भूमिका घेतली असून, कोल्हापुरातूनही शासनाकडे पाठपुरावा केला जाणार आहे.
सांगलीच्या संघटनेने पालकमंत्री सुरेश खाडे यांना निवेदन देऊन लेसरवर बंदीची मागणी केली. संघटनेने सांगितले की, लेसरच्या माऱ्यामुळे डोळ्यांच्या पडद्याला (नेत्रपटल) छिद्र पडलेले रुग्ण मोठ्या संख्येने उपचारांसाठी येत आहेत.
गेल्यावर्षी गणेशोत्सव आणि दसऱ्या दरम्यानच्या विविध मिरवणुकांदरम्यान लेसरचा वापर मोठ्या प्रमाणात झाला होता. त्यानंतरच्या महिन्याभरात जिल्हाभरातील नेत्रविकारतज्ज्ञांकडे डोळ्यांच्या उपचारांसाठी गर्दी होऊ लागली. लेसरमुळे ८० तरुणांच्या डोळ्यांच्या पडद्याला इजा झाल्याची नोंद संघटनेने केली आहे.