गणेशोत्सव मंडळांना पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार 31 ऑगस्टपूर्वी अर्ज करण्याचे आवाहन

राज्यात गणेश उत्सवास दिनांक 7 सप्टेंबरपासून सुरुवात होत आहे. त्यानिमित्त राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागातर्फे सन 2024 च्या गणेशोत्सवात सहभागी होणाऱ्या राज्यातील उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.

राज्यातील पहिल्या तीन विजेत्या मंडळांना अनुक्रमे पाच लाख, अडीच लाख रुपये व एक लाख रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे, राज्यातील अधिकाधिक मंडळांनी यामध्ये सहभाग नोंदवावा आणि 31 ऑगस्टपूर्वी अर्ज करावेत, असे आवाहन सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले आहे.

या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, मुंबई यांच्या mahotsav.plda@gmail.com या ई मेल आयडीवर 31 ऑगस्टपूर्वी परिपूर्ण अर्ज सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे. या पुरस्कारांसाठी निवड होणाऱ्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी विविध निकष असतील. या स्पर्धेसाठी सांस्कृतिक कार्यक्रम, स्पर्धांचे आयोजन, संस्कृतीचे जतन संवर्धन, राज्यातील गडकिल्ले यांचे जतन व संवर्धन,

राष्ट्रीय/राज्य स्मारके, धार्मिक स्थळांविषयी जनजागृती, जतन व संवर्धन, सामाजिक उपक्रम, पर्यावरणपूरक मूर्ती, पर्यावरणपूरक सजावट (थर्मोकोल, प्लास्टिक विरहीत), ध्वनिप्रदूषण रहित वातावरण, पारंपरिक/ देशी खेळांच्या स्पर्धा आणि गणेश भक्तांसाठी देत असलेल्या प्राथमिक सुविधा आदी बाबींवर गणेशोत्सव मंडळांना गुणांकन दिले जाणार आहे.