सोलापूर आणि माढा लोकसभा मतदारसंघांतील विजयानंतर सोलापूर जिल्ह्यात शरद पवार, विजयसिंह मोहिते-पाटील आणि सुशीलकुमार शिंदे या तिघा ज्येष्ठ नेत्यांचे सूत पुन्हा जुळले आहे.
यातच जिल्ह्यातील राष्ट्रवादी शरद पवार गटाची संपूर्ण सूत्रे मोहिते-पाटील कुटुंबीयांकडे सोपविण्यात आली असून जिल्ह्यातील विधानसभेच्या उमेदवारांची निवड मोहिते-पाटील यांच्याच सल्ल्यानेच होणार असल्याचे स्पष्ट संकेत खासदार सुप्रिया सुळे यांनी दिले आहेत.त्यातून केवळ स्वपक्षाच्याच नाहीत तर महाविकास आघाडीच्या सर्व अकरा जागा जिंकून देण्याचा चंग बांधत मोहिते-पाटील कुटुंबीय सक्रिय झाले आहेत.
राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या शिव स्वराज्य यात्रेसाठी सोलापुरात आलेले प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी तर मोहिते-पाटील कुटुंबीयांविषयी जाहीरपणे कृतज्ञता व्यक्त केली. तर खासदार सुप्रिया सुळे यांनी त्यापुढे जाऊन माढा व सोलापूर लोकसभेच्या दोन्ही जागा जिंकून देत भाजपचे उच्चाटन करण्यात मोठा हातभार लावणाऱ्या मोहिते-पाटील कुटुंबीयांच्या सल्ल्यानेच जिल्ह्यातील विधानसभेसाठी उमेदवार निवडले जाणार असल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. त्यामुळे आता जिल्ह्यातील राजकारणाची संपूर्ण सूत्रे पुन्हा मोहिते-पाटील यांच्या ताब्यात जाणार असल्याचे मानले जात आहे.