दिवाळी अंक हे माणसाला अधिक समृध्द करतात : केदार शिंदे

दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर प्रकाशित होणारे दिवाळी अंक हे साहित्यप्रेमींसाठी जणू पर्वणीच असून यामुळे माणूस अधिक समृध्द होतो असे प्रतिपादन मराठी चित्रपट, मालिका व नाट्य दिग्दर्शक केदार शिंदे यांनी केले. दामाजी एक्सप्रेस परिवारातील अक्षरगंधच्या तिसऱ्या दिवाळी अंकाचे प्रकाशन केदार शिंदे यांच्या हस्ते शनिवारी सायंकाळी सोलापूरातील हॉटेल बालाजी सरोवर येथे करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते.

केदार शिंदे म्हणाले, आधुनिक काळात वाचन संस्कृती लोप पावत चालली असन सोशल मिडीयामुळे पुस्तके हातात घेण्याऐवजी मोबाईलला प्राधान्य देतात. कोणतेही लेख व माहिती लोकांना आता सोशल मिडीयाच्या माध्यमातून सहज उपलब्ध होवू लागली आहे. अशा परिस्थितीत साहित्यप्रेमींना जे हवे असते ते मोबाईलवरती मिळू लागले आहे. परंतू मोबाईलवर त्याचे संपूर्ण वाचन होत नाही. त्यामुळे दिवाळीच्या फराळासोबत हातामध्ये दिवाळी अंक असला की दिवाळीचा आनंद व्दिगुणीत होतो असे केदार शिंदे म्हणाले. यावेळी अक्षरगंधचे संपादक दिगंबर भगरे, नृत्य प्रशिक्षक मयुरेश माणकेश्वर, गौरव शहा, पोपट मोरे आदी उपस्थित होते.