सांगोला येथे पिग्मी एजंटाच्या डोळ्यात चटणी टाकून पिग्मीची रक्कम पळवली 

आबासो अशोक राऊत हे विजयलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था, शाखा सांगोला या बँकेत कॅशियर म्हणून सकाळी दहा ते पाच नोकरी करतात व नंतर सांगोला शहरात पिग्मी गोळा करतात. हे दिनांक ३ मार्च रोजी फिर्यादी नेहमीप्रमाणे बँकेत कामाला गेले. दोन वाजण्याच्या दरम्यान मित्रासोबत इंदापुर येथे शाळेच्या कामानिमीत्त गेले होते. रात्री परत आठ वाजण्याच्या सुमारास सांगोला येथे येऊन सांगोला शहरामध्ये पिग्मी गोळा केली. ते रोख व ऑनलाईन स्वरूपात पिग्मी गोळा करतात, सोमवारी रोख स्वरूपात ६९ हजार रुपये पिग्मी गोळा झाली होती, तर स्वतः जवळील २५ हजार रुपये बॅगमध्ये ठेवले, उरलेली रक्कम खिशामध्ये ठेवली होती. यांनी शेवटची पिग्मी मिरज रेल्वे बोगदयाजवळील एका दुकानातून घेतली आणि रात्री पावणेदहा वाजण्याच्या सुमारास घराकडे निघाले होते.

माऊली वाशींग सेंटर येथून राऊत मळ्याकडे जाणाऱ्या रोडकडे वळले, ओढ्याच्या अलीकडील कच्या रस्तावर अंधारामध्ये समोरच एक रेड ब्लॅक कलरची पल्सर गाडी उभी होती. तेथे चार अनोळखी इसम उभे होते त्यातील एकजण अचानक फिर्यादी यांच्याकडे पळत आला आणि तोंडावर, डोळ्यामध्ये तिखट टाकले. डोळ्यात तिखट गेल्यामुळे फिर्यादी यांनी ब्रेक मारून गाडी थांबविली. तोपर्यंत सर्वजण फिर्यादी यांच्या जवळ आले, त्यातील एकाने समोरून पकडले तर दुसरा बॅग ओढु लागला. त्यातील दोघांनी फिर्यादी यास लाथाबुक्याने मारहाण केली. ते बॅग सोडत नसल्याने एका चोरट्याने पाठिमागुन पाठीवर चावा घेतला आणि जोरात ढकलुन खाली पाडले, बॅग हिसकावुन घेतली व पळून गेले. हि घटना सोमवारी रात्री पावणे दहा च्या सुमारास घडली. याप्रकरणी दिनांक ४ मार्च रोजी आबासो अशोक राऊत रा. राऊत मळा, सांगोला यांनी चार अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.