सांगोल्यात औरंगजेबाचे स्टेटस ठेवल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल

समाज माध्यमावर औरंगजेबाचे उदात्तीकरण करणारे स्टेटस ठेवल्यामुळे राज्यात दोन समाजांमध्ये तेढ निर्माण होऊन दंगलीचे प्रकार घडत असताना, सांगोल्यात देखील असाच काहीसा प्रकार समोर आला आहे. सांगोला शहरातील दोघा तरुणांनी आपल्या व्हॉट्सपच्या स्टेस्टसवर औरंगजेबाचा फोटो ठेवून शांतता बिघडवण्याचे काम केले. त्यामुळे सांगोला पोलिसांनी त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी पोलिस हेडकॉन्स्टेबल आप्पासो पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चिकु खतीब आणि सैफ शेख दोघे रा. सांगोला यांच्याविरुद्ध सांगोला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, सांगोला येथील सैफ शेख याने आपले मोबाईल व्हॉटसअॅप आणि फेसबुकवर सर्व लोकांना दृष्टीस येईल अशा प्रकारे औरंगजेबाचे फोटो व गाणे प्रसारीत केल्याचे दिसले. सदर स्टेटस ठेवल्यामुळे वाद आणि तेढ निर्माण होवू नये म्हणून पोहेकॉ आप्पासो पवार यांनी सैफ शेख यास फोन करून सदरचे स्टेटस आणि प्रसारीत केलेले फोटो डिलीट करण्याबाबत सांगितले. दरम्यानच्या काळात दिपक उर्फ गुंडा खटकाळे रा. वासुद ता. सांगोला यानी पोहेकॉ आप्पासो पवार फोन करुन चिकु खतीब रा. सांगोला याने औरंगजेबाचे स्टेटस ठेवले आहे, त्यामुळे दोन समाजात तेढ निर्माण होण्याची शक्यता असल्याची माहिती फोनद्वारे दिली.

त्यामुळे पोहेकॉ आप्पासो पवार यांनी चिकु खतीब आणि सैफ शेख यानी वरीलप्रमाणे स्टेटस ठेवल्याने दोन समाजात तेढ निर्माण होण्याची शक्यता असल्याने तोहिद मुल्ला यांना फोन करून कळविले. दरम्यान शहरातील कडलास नाका व मुजावर गल्ली येथे हिंदू व मुस्लीम लोक मोठ्या प्रमाणात जमा होवू लागले असून त्यांच्यात वाद होण्याची शक्यता असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. पोलीस निरीक्षक अनंत कुलकर्णी यांच्यासह इतर पोलीस अधिकारी आणि अंमलदार हे कडलास नाका येथे आले आणि त्यांनी दोन्ही समाजातील लोकांची समजूत काढली.

चिकू खतीब आणि सैफ शेख दोघे रा. सांगोला यांनी त्यांच्या मोबाईलवर आणि फेसबुकवर औरंगजेबाचा फोटो आणि काही मजकुर असलेले गाणे स्टेटसवर आणि फेसबुकवर ठेवल्यामुळे हिंदू आणि मुस्लीम यांच्यात शत्रुत्वाची, द्वेषाची भावना निर्माण झाली. त्यामुळे हिंदू मुस्लीम यांच्यात एकोपा टिकवण्यास बाधा येवून सार्वजनिक शांतता बिघडली आणि सर्वसामान्यांच्या मनात असुरक्षीततेची भावना निर्माण होवून कडलास नाका आणि मुजावर गल्ली येथे हिंदू आणि मुस्लीम लोक मोठ्या प्रमाणात जमा होण्यास कारणीभूत झाले आहेत, म्हणुन पोहेकॉ आप्पासो पवार यांनी चिकू खतीब आणि सैफ शेख दोघे रा. सांगोला यांच्याविरुध्द सांगोला पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.