ग्रामपंचायत निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचे दारू अड्डयावर छापे

ग्रामपंचायत निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मंगळवेढा शहर व भाळवणी येथे अवैध दारू विक्री ठिकाणी पोलिसांनी छापे मारून ११९० रुपयांचा मुद्देमाल जप्त करून शारदा महादेव मंडले ( वय ६०, रा. साठेनगर), जावेद सत्तार बागवान ( वय ३४, रा. भाळवणी) या दोघांविरूध्द महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम ६५- ई अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रविवार दि. ५ नोव्हेंबर रोजी ग्रामपंचायत निवडणूका होत असल्याने शांततेत मतदान प्रक्रिया पार पडावी या पार्श्वभूमीवर पोलिस निरिक्षक रणजित माने यांनी पोलिसांना अवैध धंदयावर कारवाई करण्याचे फर्मान काढले होते.

पहिल्या घटनेत यातील महिला आरोपी शारदा महादेव मंडले ही दि. ४ रोजी ११.३० वा. सहाय्यक – पोलिस निरिक्षक बापूसो पिंगळे, महिला पोलिस हवालदार सुनिता चवरे, पोलिस नाईक कृष्णा जाधव आदी शहरात पेट्रोलिंग करीत असताना साठेनगर येथील राहते घरासमोर पत्राशेडशेजारी एक महिला अवैधरित्या देशी दारूची विक्री करीत असल्याची माहिती या पथकाला मिळताच सदर पथकाने धाड टाकून ४२० रुपये किमतीच्या देशी संत्रा १२ सिलबंद बाटल्या जप्त केल्या.

तर दुसऱ्या घटनेत भाळवणी गावचे शिवारात पोलिस हवालदार महेश कोळी, तुकाराम कोळी यांना जावेद सत्तार बागवान हा फौजी ढाब्याच्या पाठीमागे चोरून देशी दारू विक्री करीत असल्याची माहिती मिळताच त्या ठिकाणी सायंकाळी ४.३० वा. छापा टाकून ७७० रूपये किमतीच्या १३ आयकॅप देशी दारू संत्रा बाटल्या जप्त करण्यात आल्या. याची फिर्याद पोलिस अंमलदार सुरज साळुंखे व खंडाप्पा हत्ताळे यांनी दिल्यावर वरील दोघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला.